अन् मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

मुळा धरणातून जायकवाडीला सोडलेल्या पाण्यामुळे राहुरीची मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. वाळुच्या खड्ड्यामुळे ओसाड झालेले मुळा नदीपात्र तुडुंब भरल्याने पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शनिवारी सायंकाळ नंतर नदीपात्रातील पाणी ओसरत जाणार आहे.

जायकवाडीला 1 हजार 900 दशलक्ष घनफुट पाणी सोडण्याचा आदेश झाल्याने गुरूवारी सकाळी 9 वाजता भोंगा वाजवून मुळा धरणातून 6 हजार क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. दुपारी 4 वाजता 8 हजार तर राञी 12 वाजता या पाण्याचा विसर्ग 12 हजार क्युसेक पर्यंत वाढविण्यात आला. शुक्रवारी दुपारी 1 वाजता मुळाचे पाणी प्रवरासंगमच्या पुढे असलेल्या जायकवाडी बॅकवॉटरला जाऊन मिळाले आहे. शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत मुळाचे पाणी जायकवाडी धरणात जाऊन पोहचल्यानंतर मुळाच्या पाण्याचा अडीच दिवसाचा प्रवास थांबणार आहे.

जायकवाडीला मुळा नदीपात्रातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा पाऊस नसल्याने मुळा डावा व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात शेती तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने पुढील 3 महिन्यापर्यंत नदीकाठच्या परिसरातील जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत होणार आहे.