मुळा नदीकाठच्या टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांचे धरणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

पिंपळगाव खांड (ता.अकोले) धरणाचे पाणी पारनेर व संगमनेर तालुक्यातील मुळा नदीकाठच्या टंचाईग्रस्त गावांना मिळण्याच्या मागणीसाठी सदर गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला.

या आंदोलनात शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर पाटील, साकुरचे सरपंच व संगमनेरचे सभापती शंकरराव खेमनर, भूमिपुत्र संघटनेचे संतोष वाडेकर, भाऊसाहेब डोलनर, उत्तम कुदनर, बाजीराव गागरे, रावसाहेब गोळे, सागर सुदाम, भाऊसाहेब सागर, पोपट कुदनर, रंगनाथ धुळगंड, पोपट वाडेकर, नामदेव खेमनर, भाऊसाहेब टेकडे, गुलाब भोसले, दादाभाऊ लोंढे, बाबाजी सागर, तुषार धुळगंड, लहानु खेमनर, दीपक भोसले, गोरख टेकडे, संपत दरेकर, सतीश पवार आदिंसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

पिंपळगाव खांड (ता.अकोले) धरणाचे पाणी पारनेर व संगमनेर तालुक्यातील मुळा नदीकाठच्या देसवडे, मांडवे खुर्द, जांबुत, साकुर, पोखरी, मांडवे, बिरेवाडी, हिवरगाव, जांभुळवाडी, खडकवाडी, पळशी, शिदोडी आदि टंचाईग्रस्त गावांना मिळावे अशी मागणी सातत्याने केली आहे. त्या अनुषंगाने ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनीही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आग्रही मागणी केली होती. सदर मागणी मान्यही करण्यात आली होती. पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर येथे दि.27 ऑक्टोबर रोजी झालेल्या टंचाई आढावा बैठकीत उपरोक्त टंचाईग्रस्त गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्याची स्पष्ट निर्देश दिले होते. 10 डिसेंबर रोजी आ.वैभव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली लाभधारक व टंचाईग्रस्त गावांच्या एकत्रित झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ही टंचाईग्रस्त शेवटच्या मांडवे, शिंदोडी गावापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झालेला होता. मात्र आ.वैभव पिचड व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आपल्या तालुक्यातील असलेले व येथेच नोकरी करणार्‍या अधिकार्‍यांना हाताशी धरून खालचे चार बंधारे कोरडे ठेवण्याचे कारस्थान राबविल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

दुष्काळात होरपळणार्‍या पारनेर व संगमनेर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवून पिचड पिता-पुत्रांनी त्यांच्या अन्नात विष कालवण्याचे काम केले आहे. त्याची राजकीय किंमत या दोघांना मोजावी लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणारी साकुर-मांडवे परिसरातील जनता पिता-पुत्र व त्यांच्या पक्षावर मतबंदी केल्याशिवाय राहणार नाही. यांच्यात एवढी मर्दुमकी असेल तर त्यांनी आपल्या भागातील निळवंडे, भंडारदरा आदि धरणांमधून जायकवाडीत जात असलेले पाणी रोखून दाखवायचे होते आणि आमच्या खालच्या भागाकडे येणारे पाणीही आता अडवतात तसे पावसाळ्यात हे पाणी थोपवून दाखविण्याचे आव्हान आंदोलकांनी पिचड पिता-पुत्रांना दिले. या बिकट परिस्थितीची बघ्याची भुमिका घेणार्‍या लोकप्रतिनिधींना राजकीय किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

30 डिसेंबर पर्यंन्त आभाळवाडी (ता.संगमनेर) या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यापर्यंतचे सर्व 14 बंधारे पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून शेती व इतर वापरासाठी मोठ्या प्रमाणावर भरून ठेवण्यात आले आहेत. आभाळवाडी खालील जांबुत साकुर 1, 2, मांडवे बुद्रुक या कोल्हापूर पद्धतीचा बंधार्‍यामध्ये आवर्तनाचे पाणी पोचू शकते हे स्पष्ट झालेले आहे. मात्र वरील भागातील लाभधारकांनी पाटबंधारे खात्यातील काही अधिकारी कर्मचार्‍यांना हाताशी धरीत बेकायदेशीर कृत्ये करीत पाणी अडवून शेवटच्या गावांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहेत. अडवलेल्या सर्व बंधार्‍यातून पाणी सोडण्यात यावे, तीन पेक्षा जास्त ढापे कुठल्याही बंधार्‍यावर ठेवू नयेत, प्रत्येक बंधार्‍यावरील जास्तीचे ढापे काढल्यास सदरचे पाणी शेवटच्या मांडवे, शिंदोडी पर्यंन्त पोहोचणे शक्य असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. त्यामुळे तात्काळ निर्णय घेऊन सर्व बंधार्‍यावरील जास्तीचे ढापे पोलीस बंदोबस्तात काढून घ्यावे. अधिकारांचा गैरवापर करून पाण्यापासून वंचित ठेवणार्‍या कार्यकारी अभियंता किरण देशमुख व उपअभियंता रामनाथ आरोटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.