
जम्मू–कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर येथील अनेक कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. एजिस या बहुराष्ट्रीय कंपनीने प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने 70 कर्मचाऱ्यांना नोटीस धाडली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. मात्र, या परिस्थितीत कश्मीर प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कर्मचाऱ्यांना तीन महीन्याचे वेतन देण्याचा निर्णय कश्मीर प्रशासनाने घेतला आहे.
म्हणून कंपनीची कॉल सेंटर सेवा बंद
एजिस कंपनीने श्रीनगरमधील बीपीओ ही कॉल सेंटरसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कश्मीर खोऱ्यातील अनेक व्यवसाय 5 ऑगस्टनंतर बंद झाले आहेत. पाकडय़ांकडून दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारने मोबाईल फोन आणि इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे एजिस कंपनीची क्लाईंट असलेल्या व्होडाफोनच्या कॉल्समध्ये 1 लाखांची घट होऊन ते 10 हजारांवर आले आहेत.
एजिसने 70 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्याचे वृत्त प्रसारित होताच श्रीनगर प्रशासनाचे उपायुक्त डॉ.शाहिद इकबाल चौधरी यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी एजिसच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि कर्मचाऱ्यांना धाडलेल्या नोटीशीबद्दल चर्चा केली.
























































