मुलीचा विनयभंग करणाऱ्या केअरटेकरची जोडप्याने केली हत्या; मृतदेह नाल्यात फेकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलींचा सांभाळ करण्यासाठी ठेवलेल्या 69 वर्षांच्या केअरटेकरनेच आपल्या 13 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचे समजताच संतप्त झालेल्या दाम्पत्याने केअरटेकरला बेदम मारहाण केली. त्यात केअरटेकरचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी दामप्त्याने त्याचा मृतदेह मानखुर्द येथील नाल्यात फेकला. मानखुर्द पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पोलिसांनी दाम्पत्याला अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मानखुर्द पोलिसांनी सोमवारी मुलुंड येथील एका जोडप्याला त्यांच्या मुलांच्या देखभाल करणार्‍या 69 वर्षांच्या केअरटेकरची हत्या करून त्याचा मृतदेह नाल्यात फेकल्याप्रकरणी अटक केली आहे. आपल्या 13 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करताना आपण 69 वर्षांचे केअरटेकर अब्दुल खलील शेख यांना दोनदा पकडले होते. त्यानंतर पुन्हा असे न करण्याचा इशाराही त्यांना दिला होता. मात्र, त्यांनी पुन्हा मुलीशी गैरवर्तन केल्याने रागाच्या भरात त्यांना मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ठार मारण्याचा हेतू नसल्याचे दाम्पत्याने सांगितले. याप्रकरणी सलीम जाफर (38) आणि त्यांची पत्नी फिरोजा सलीम (36)या दाम्पत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलुंडमध्ये राहणारे ते दोघे मासे विक्रेते आहेत.

या दाम्पत्याने अब्दुल खलील शेख (69) यांना मुलांचा सांभाळ करण्यासाठी केअरटेकर म्हणून ठेवले होते. ते कामानिमित्त घराबाहेर असल्याने मुलांना सांभाळण्यासाठी त्यांना केअरटेकर म्हणून ठेवल्याचे दाम्पत्याने सांगितले. मानखुर्द पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदिनाथ गावडे यांनी या हत्येबाबत माहिती दिली. शनिवारी त्यांना मानखुर्द येथील नाल्याजवळ एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळला. त्यांच्या शरीरावर जखमेच्या खुणा नसल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या वर्णनाची माहिती आणि फोटो विविध पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला.

रविवारी एका महिलेने पोलिसांशी संपर्क साधला आणि मृत व्यक्ती तिचे वडील असल्याचे सांगितले. ते मुलुंडमधील एका दाम्पत्याकडे केअरटेकर म्हणून काम करत असल्याचे 38 वर्षांच्या नैन साबीर शेख यांनी सांगितले. गावातील एका दाम्पत्याने तिच्या वडिलांना केअरटेकर म्हणून कामावर ठेवले आणि त्यांना आश्रय दिला. हे दाम्पत्य कामानिमित्त बाहेरगावी जात असल्याने तिचे वडील या दाम्पत्याच्या दोन मुलांची काळजी घेत होते.

नैन यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी जाफर आणि त्याच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यात या दाम्पत्याने आपण केलेल्या मारहाणीत शेख यांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. शुक्रवारी घरी परतल्यावर 13 वर्षांच्या मुलीने त्यांना शेख यांनी आपला विनयभंग केल्याची माहिती आईवडिलांना दिली. यापूर्वीही शेख यांनी मुलीशी गैरवर्तन केले होते. त्यांना दोनवेळा पकडल्यानंतर त्यांना समज देण्यात आली होती.

शुक्रवारी रात्री मुलीने शेख यांनी पुन्हा विनयभंग केल्याचे सांगितल्यावर आपल्याला राग अनावर झाला. त्यात आपण त्यांना मारहाण केली. शेख यांना ठार मारण्याचा आपला हेतू नव्हता. मात्र, मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतला.रात्री 11 वाजता शेख यांचा मृतदेह समुद्रात फेकण्यासाठी घरातून निघालो. मात्र, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांचा मृतदेह नाल्यात फेकून दिला.त्यानंतर तेथून पळ काढल्याचे दामप्त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.