
मुलगी आपल्याशी बोलत नाही, ती जाणीवपूर्वक टाळते. त्यामुळे एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाची सटकली. त्याने मुलुंड येथे त्या मुलीला गाठले आणि तिच्यावर कोयत्याने वार केला. पण तो वार मध्यस्थी आलेल्या मुलीच्या मित्राच्या मानेवर झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या घटनेने खळबळ उडाली असून मलुंड पोलिसांनी आरोपीला बेडय़ा ठोकल्या आहेत.
आशीष गौतम बनसोडे (21) असे त्या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. तो बदलापूर येथे राहतो. पीडित 16 वर्षांची मुलगी आणि आशीष हे बदलापूरचे राहणारे असून त्यांची जुनी ओळख आहे. मात्र मुलगी आता बोलत नाही, टाळते त्यामुळे आशीष अस्वस्थ झाला होता. बुधवारी मुलगी मुलुंड येथे कॉलेजसाठी आली होती. आशीषदेखील तिच्या मागोमाग तेथे आला. मुलीचा गळा आवळत तू माझ्याशी का बोलत नाहीत असे म्हणू लागला. त्यावेळी अचानक त्याने सोबत आणलेला कोयता काढून हल्ला केला.


























































