दहावीच्या सुधारित प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ऑनलाइन जाहीर करा! 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावी इयत्तेच्या सुधारित प्रश्नपत्रिकेचे स्वरूप संकेतस्थळावर जाहीर करावे अशी मागणी युवासेनेने राज्य शिक्षण मंडळाकडे केली आहे. त्या मागणीचे पत्र मंडळाला ई-मेलद्वारे पाठवण्यात आले आहे.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने केलेल्या मागणीमुळे दहावीच्या भाषा आणि समाजशास्त्र या दोन विषयांच्या अंतर्गत गुणांचे मूल्यमापन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला, परंतु बदललेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपाचे प्रशिक्षणही शिक्षकांना ऑक्टोबर महिन्यात देण्यात आलेले नाही.

17 नंबरचा अर्ज भरणाऱया विद्यार्थ्यांना या बदललेल्या प्रश्नपत्रिकेची स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे. परंतु त्याची काहीच माहिती न मिळाल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे अशा आशयाचे पत्र युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांना ई-मेलद्वारे पाठवले आहे. प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपाची माहिती तातडीने जाहीर करा अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे.