मुंबईतील लोकल ट्रेनचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला जाईल, एकनाथ शिंदे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. त्यामुळे मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. राज्यातील मंदिरे पुन्हा उघडण्याबाबत राज्य सरकार परिस्थितीनुसार निर्णय घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भात पावसाचा जोर वाढल्याने पूरपरिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले आहेत. त्याचा फटका भंडारा, चंद्रपूर गडचिरोली जिह्यांना बसला आहे. एकनाथ शिंदे गडचिरोली जिह्याचे पालकमंत्रीही आहेत. पुरपरिस्थीतीच्या संदर्भात नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, गडचिरोलीत महापुरामुळे शेती आणि घरांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून लवकरात लवकर मदत जाहीर करू.

पूरग्रस्तांसाठी जीआर वाढा

दरम्यान भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिह्यात पुरामध्ये मोठे नुकसान झाले आहे. या भागात राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोल्हापूरमधील पूराच्या धर्तीवर स्वतंत्र जीआर काढून या भागातील पुरग्रस्तांना तातडीने मदत देण्याची सूचना फडणवीस यांनी केली आहे.