खुशखबर! मुंबईतील 10 टक्के पाणी कपात रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांत सद्यस्थितीत 1178751 दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला असून हे पाणी पुढील दहा महिन्यांना पुरणारे आहे. तलावांत समाधानकारक पाणीसाठा जमा झाल्यामुळे 1 जुलैपासून मुंबईत सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात बुधवार 9 ऑगस्टपासून मागे घेत असल्याचे पालिकेने आज जाहीर केले आहे. यामुळे मुंबईत 1 जुलैपासून पाण्याची काटकसर करणार्‍या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईला महापालिकेकडून अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास विलंब लागत असल्याने तलाव तळ गाठत आहेत. त्यामुळे पालिकेला एक ते दोन महिने पाणीकपात लागू करून नियोजन करावे लागत आहे. यावर्षीदेखील पालिकेने 1 जुलैपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीदेखील पाणीसाठा 11 टक्क्यांपर्यंत खाली गेल्यामुळे 27 जूनपासून पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र जुलैच्या सुरुवातीपासून तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे दोन आठवड्यांनंतर पाणीकपात मागे घेण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी पाणीकपात कधी रद्द होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले होते. सद्यस्थितीत जमा झालेले पाणी पुढील 306 दिवसांना म्हणजेच दहा महिन्यांना पुरणारे आहे. दरम्यान, 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली असली तरी सर्व तलाव 100 टक्के अद्याप भरलेले नसल्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.