मुंबईत कोरोनाच्या प्रभावात रक्ततुटड्याचे संकट, फक्त 119 बाटल्या रक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रभाव असताना रक्त तुटवड्याचे संकट निर्माण झाले आहे. राज्य रक्त संक्रमण परिषद मान्यताप्राप्त मुंबईतील 54 रक्तपेढ्या, पालिका रुग्णालयांमध्ये केवळ 119 बाटल्या रक्त शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यभरात राज्य रक्त संक्रमण परिषद मान्यताप्राप्त रक्तपेढ्या, पालिका, सामाजिक संस्था, मंडळे यांच्याकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. रुग्णालयांमध्ये अ‍ॅक्सिडंट, ऑपरेशनसह थॅलेस्थेमियासारख्या आजारात मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज यातून पूर्ण केली जाते. मात्र मुंबईत मार्चपासून कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून रक्तदान शिबिरे मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यामुळे रक्त तुटवडा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनानुसार मुंबईसह राज्यभरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामुळे काही दिवस रक्ताची कमतरता जाणवली नाही. मात्र सद्यस्थितीत पुन्हा एकदा रक्तदान कमी झाल्याने रक्ततुटवडा निर्माण होण्याचा धोका निर्माण झाल्याचे नगरसेवक अरविंद भोसले यांनी सांगितले. दरम्यान, सद्यस्थितीत उपलब्ध असणारा रक्तसाठा हा गेल्या काही वर्षांतील निच्चांकी असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे व्हॉलेंटियर सदस्य अनिल गरे यांनी सांगितले. त्यामुळे रक्ततुटवडा टाळण्यासाठी तातडीने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपनगरात रक्तदान वाढण्याची गरज
मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांच्या आवाहनानंतर मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिवसेनेसह अनेक सामाजिक संस्था, मंडळांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी आता रक्तदानाला मिळणारा प्रतिसाद कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व-पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तसाठ्याचे प्रमाण वाढवण्याची गरज असल्याचे अनिल गरे म्हणाले.

रक्तदात्यांना कोरोनाचा धसका!
राज्य रक्त संक्रमण परिषद मान्यताप्राप्त रक्तपेढ्या, पालिका, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, मंडळांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाच्या धास्तीने रक्तदानास पुढाकार घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र रक्तदान शिबिरांमध्ये राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खबरदारी घेऊन रक्तदान उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदानासाठी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा असे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे.