एसी लोकलचे प्रवासी ‘हॉट’ सीटवर! वातानुकूलित यंत्रणा ठप्प; उकाड्यामुळे गाडीचे दरवाजे उघडे ठेवण्याची नामुष्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तापमानाचा चढलेला पारा आणि घामाच्या धारांपासून वाचण्यासाठी अनेकजण एसी लोकलच्या प्रवासाला पसंती देत आहेत. पण आज पश्चिम रेल्वेची एसी लोकल सेवा बोंबलल्याने गारेगार प्रवास अनुभवणाऱया हजारो प्रवाशांना आज ‘हॉट’ सीटवर बसून प्रवास करावा लागला. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलची वातानुकूलित यंत्रणा अचानक मीरा रोड स्थानकात बंद पडली. त्यामुळे प्रवासी घामाघूम झाले होते. तसेच अनेकांना गुदमरू लागल्याने मीरा रोड-महालक्ष्मीदरम्यान एसी लोकलचे दरवाजे उघडे ठेवण्याची नामुष्की पश्चिम रेल्वेवर ओढावली.

लोकल प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा म्हणून पश्चिम रेल्वेकडून दररोज 79 फेऱया चालवल्या जातात, मात्र आज सकाळी सातच्या सुमारास एका एसी लोकल गाडीत बिघाड झाल्याने विरार-चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या सात फेऱ्या रद्द केल्या. त्यामुळे एसी लोकलची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना इच्छा नसतानाही साध्या लोकलने धक्के खात प्रवास करावा लागला. तर सकाळी 9 वाजता विरारहून चर्चगेटला जाणाऱया गाडीतील एसी यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे गुदमरू लागल्याने प्रवाशांनी मीरा रोड स्थानकात साखळी ओढत मोटारमनचे त्याकडे लक्ष वेधले. त्याची दखल घेत सर्व डब्यांचे दरवाजे उघडे ठेवून महालक्ष्मी स्थानकापर्यंत गाडी चालवण्यात आली. एकाच दिवशी झालेल्या या बिघाडामुळे एसी लोकल प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत आपला संताप व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

रेल्वेने पैसे परत देण्याची मागणी
एसी लोकल सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. आम्ही एसी लोकलने प्रवास करण्यासाठी जादा पैसे मोजले आहेत, मात्र आता स्थानकावर एसी लोकलऐवजी साधी लोकल आली. त्यामुळे रेल्वेने आमच्या तिकिटाचे पैसे परत करावेत, अशी मागणी जगन्नाथ जालुई या प्रवाशाने ट्विट करत केली आहे.