तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान चोरी झाल्यास मिळणार नुकसान भरपाई!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबाद-मुंबईदरम्यान 17 जानेवारीपासून तेजस ट्रेन धावणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) ही खासगी ट्रेन चालवण्यात येणार आहे. 17 जानेवारीला अहमदाबाद-मुंबई मार्गावर तेजस ट्रेनचे उद्घाटन होणार असून 19 जानेवारीला या ट्रेनचे लोकार्पण होईल. आठवड्यातील सहा दिवस ही ट्रेन मुंबई- अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. 10 जानेवारीपासून याचे बुकींग सुरू होणार आहे. यापूर्वी अशी खासगी तेजस ट्रेन दिल्ली-लखनऊ या मार्गावर सुरू करण्यात आली आहे.

या तेजस एक्सप्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवासादरम्यान चोरी झाल्यास प्रवाशांना एक लाखापर्यंतची नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने विमा कवचाचीही तरतूद केली आहे. आता या एक्सप्रेसमधील प्रवाशांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता विमा कवच देण्यात येणार आहे. हे विमाकवच 25 लाख रुपयांचे असेल.प्रत्येक प्रवाशाला हे विमाकवच मिळणार आहे. त्यासोबतच प्रवासादरम्यान चोरी किंवा दरोड्याची घडना घडल्यास एक लाखाचे अतिरिक्त विमाकवचही असणार आहे. प्रवासादरम्यान अपघातात मृत्यू झाल्यास प्रवाशांच्या वारसांना 25 लाख रुपये मिळणार आहेत. तर कोणताही अवयव गमावावा लागल्यास 15 लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. तातडीने रुग्णालयातील उपचारांसाठी पाच लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.

तेजस एक्सप्रेस लखनऊ- नवी दिल्ली- लखनऊ या मार्गावर 4 ऑक्टोबर 2019 पहिल्यांदा सुरू करण्यात आली. या एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अहमदाबाद-मुंबई या मार्गावरही तेजस एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये उत्तम खानपानाच्या सोयीसोबतच, सुरक्षा, हाऊसकिपींग आणि इन्फोटेनमेंटसारख्या सुविधाही पुरवण्यात येतात. त्यामुळे या एक्सेप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विमाकवचासोबतच प्रवासदरम्यान एक्सप्रेसला एका तासाचा विलंब झाल्यास प्रवाशांना 100 रुपयांचा परतावा मिळणार आहे. तर एक्सप्रेसला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास 250 रुपये परतावा मिळणार आहे.