
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई विमानतळाच्या नावात ‘महाराज’ असा उल्लेख नव्हता. हा उल्लेख करण्यासाठी विमानतळाचा कारभार पाहाणाऱया जीव्हीके व्यवस्थापनाला शिवसेनेने चांगलाच दणका दिला होता. त्यानंतर विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे पूर्ण नाव देण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन जीव्हीकेने शिवसेना दिले होते. त्यानुसार अखेर आज विमानतळाबाहेर ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करावे, विमानतळासमोर छत्रपतींचा पुतळा पुन्हा उभारावा, पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या शिवरायांच्या पुतळय़ाजवळ गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारावी इत्यादी मागण्यांसाठी शिवसेना गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करत आहे, मात्र जीव्हीकेने त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जीव्हीके व्यवस्थापन कार्यालयावर धडक दिली होती. यावेळी महिला विभाग संघटक राजुल पटेल, रजनी मेस्त्री भारतीय कामगार सेनेचे संजय कदम यांच्यासह विभागातील सर्व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेनेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांचे रौद्ररूप पाहून जीव्हीके व्यवस्थापन चांगलेच हादरले होते. अखेर आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख केलेला फलक विमानतळाबाहेर लावण्यात आला.




























































