
मुंबईसह कोकणात उद्या गुरुवारी वादळी वाऱयांसह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि पालघर प्रशासन सतर्क झाले आहे. यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असेही हवामानतज्ञांनी म्हटले आहे.
मुंबईसह कोकणात गेल्या 48 तासांत पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. आज उपनगरांमध्ये काही भागांत पावसाने शिडकावा केला होता. उद्या निश्चितच मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस वादळी पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी वारे अंदमानातून पुढे सरकत असून दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव आणि बंगालच्या उपसागरात वाटचाल करतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.