
भाजपने ज्यांच्यावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे ते आमदार अतुल भातखळकर माझ्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तिकीट मागायला आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला आणि त्यांना भाजपात राहायला सांगितले होते, असे विधान ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी भातखळकरांची आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘2009 च्या निवडणुकीत अतुल भातखळकर आणि भाजपाचेच एक लोखंडे म्हणून होते, तेही माझ्याकडे तिकिटासाठी आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला होता. त्या दोघांनाही मी सांगितले की, असे करू नका. ज्या पक्षात इतकी वर्षे वाढलात, राग आला म्हणून असे करू नका. आहात तिथेच रहा, हा वेडपटपणा करू नका. हे सांगत असताना अजून दोन माणसे तिथे होती त्यांच्यासमोर सांगितले. साक्षीदार म्हणून त्यांना उभे करू शकतो. हे असे घडत असते.’
























































