रिक्षा चालकांचा संप मागे! मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांसोबत मंगळवारी बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमधील रिक्षाचालकांचा संप मागे घेण्यात आला आहे. रिक्षा भाडेवाढ तत्काळ करावी, अवैध प्रवासी वाहतुकीबरोबरच ओला-उबेरसारख्या टॅक्सी सेवा बंद करावी या मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून सर्व रिक्षाचालक बेमुदत संपावर जाणार होते. परंतु जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी व मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर रिक्षा संप मागे घेण्यात आल्याची माहिती ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृति समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष शशांक राव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

रिक्षाचालकांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थिती मंगळवारी दुपारी 3 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास आहे त्यामुळे हा संप मागे घेण्यात आल्याचे शशांक राव यांनी सांगितले.

या आहेत प्रमुख मागण्या –
रिक्षाच्या भाडय़ात चार-सहा रुपये भाडेवाढ करावी.
ओला-उबेरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा बंद करावी.
बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष भरारी पथके नेमावीत.
विमा कंपनीत भरण्यात येणारे पैसे कल्याणकारी महामंडळात भरावेत.
चालक-मालकांना पेन्शन, ग्रॅज्युईटी, भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय मदत द्यावी.
हकिम समितीच्या शिफारशीनुसारच भाडेवाढ करावी.