मुंबईतील उद्योजक उशिक गालाला ईडीकडून अटक

मुंबईतील सुमाया इंडस्ट्रीजचा व्यवस्थापकीय संचालक उशिक गाला याला आज ईडीने मनी लॉण्डरिंगच्या आरोपाखाली अटक केली. त्याला 24 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. आयात मालाच्या बदल्यात अ‍ॅडव्हान्स म्हणून उशिक गालाने 998 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. विनय कुमार अग्रवाल यांनी 12 फेब्रुवारी 2022 रोजी वरळी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली होती. त्या आधारे ईडीने त्याच्यावर कारवाई केली.

उशिक गालाने हरयाणा सरकारच्या एका योजनेच्या नावाने घोटाळा केला. हरयाणा सरकारच्या ‘नीड टू फीड’ योजनेचे 7 हजार कोटींचे कंत्राट आमच्या कंपनीला मिळाल्याचे सांगून गालाने विनय कुमार अग्रवाल यांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांच्या आश्वासनांना व आमिषाला बळी पडून अग्रवाल यांनी सुमाया कंपनीत गुंतवणूक केली. हे पैसे नंतर अनेक बनावट कंपन्यांमध्ये फिरवण्यात आले, असे ईडी चौकशीत समोर आले.