तीन वर्षांत होणार वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास; सहा माळे पार्किंग, 40 मजली 33 इमारती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना आता हक्काचे घर मिळणार आहे. वरळीतील 121 चाळींच्या जागी 40 मजली 33 इमारती उभ्या राहणार असून सहा मजली पार्किंग सुविधेसह 500 चौरस फुटांचे घर, रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना, खरेदीसाठी दुकाने या सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत त्याच जागेवर अवघ्या 36 महिन्यांत उभ्या राहणार आहेत.

वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भूमिपूजन केल्यानंतर वेगाने सुरू झाले आहे. तीन वर्षांत या ठिकाणी 40 मजली 33 टॉवर उभे राहणार आहेत. येथील रहिवाशांना राहण्यासाठी सुसज्ज होणाऱया 9394 निवासी सदनिका तसेच 295 अनिवासी सदनिका बांधण्यात येणार असून व्हेट्रिफाइड टाईल्स, सिरॅमिक टाईल्स, खिडक्यांसाठी पावडर कोटिंग अॅल्युमिनियम फ्रेम यांचा वापर या सदनिकांत करण्यात आला आहे. याचा सॅम्पल फ्लॅटही तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच रहिवाशांना सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. याबरोबरच 3 पॅसेंजर लिफ्ट, 1 स्ट्रेचर लिफ्ट व 1 फायर लिफ्टचीही सुविधा दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे या भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जाणार असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईची समस्या जाणवू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मलनिःसारण प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प या माध्यमातून नागरिकांचे जीवन सुसह्य केले जाणार आहे. या सर्व इमारती भूकंपरोधक आहेत. टाटा प्रोजेक्ट्स आणि कॅपॅसिट संयुक्तरीत्या वरळीमधील या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करणार आहेत.

पुनर्वसन करताना रहिवाशांना जवळच पर्यायी घर

पुनर्वसन करताना रहिवाशांना जवळच बॉम्बे डाइंगच्या जागी पर्यायी घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे रहिवाशांना त्यांच्या डोळ्यांसमोर घर उभे राहताना बघता येणार आहे. येथे पार्किंगसाठी बेसमेंटचा तसेच पुनर्विकास करताना ट्रान्झिट कॅम्प निर्माण केले असते तर त्यामुळे पुनर्विकासाला वेळ गेला असता. मात्र हे दोन्ही पर्याय रद्द करून पहिले सहा माळे पार्किंगसाठी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे पुनर्वसन वेगाने होणार आहे. येथील रहिवाशांसाठी दोन मैदानांचा विकासही करणार असून सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

आव्हानांतून मार्ग काढला

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम करताना अनेक अडचणी येत होत्या. करारनामा, विस्थापितांचे प्रश्न अशी अशी अनेक आव्हाने होती, परंतु त्यातून मार्ग काढला. सुमारे तीन हजार पोलिसांना घरे देण्याचे प्रस्तावित असून येथील निवृत्त पोलीस तसेच 2010 पूर्वीपासून ज्यांचे वास्तव्य आहे अशा पोलिसांनाही घरे देण्याचे नियोजन आहे. कामाठीपुरा आणि कुलाबा येथील झोपडपट्टीचाही समूह पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

रहिवाशांना हक्काचे घर मिळवून देणार

वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास मागील तीन ते चार वर्षांपासून रखडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री नारळ फोडून गेले. मात्र त्यानंतर काम का झाले नाही हे माहीत नाही. यासंदर्भात माजी आमदार सुनील शिंदे, नगरसेवक आशीष चेंबूरकर, उपनेते सचिन अहिर असे सर्व आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलो. 50 हून अधिक बैठका घेतल्या. त्यानंतर हे सर्व होत असताना बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा नारळ फक्त वाढवला जात नाही तर कामही सुरू आहे. 36 महिन्यांत हे काम पूर्ण करून येथील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणार, अशी ग्वाही पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

प्रकल्पात आदित्य ठाकरे यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल

बऱयाच वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला होता. पण ज्यांच्या हाती लोकांनी या मतदारसंघाचे नेतृत्व दिले त्या आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पासाठी वर्षभरात 50 बैठका तरी घेतल्या असतील. हा प्रकल्प सुरू व्हावा, लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी भूमिका त्यांनी घेतली. आता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकर पूर्ण होईल. येणाऱया काही वर्षांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार या सर्वांच्या हस्ते चावी देण्याचा कार्यक्रम आम्ही करू. हा प्रकल्प होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्यावेळी या प्रकल्पाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आदित्यजी, तुमचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले.