
सामना प्रतिनिधी। मुंबई
बायोमेट्रिक हजेरीच्या घोळात पगार रोखण्यास जबाबदार असलेल्या शेकडो अधिकाऱयांचा 10 टक्के पगार पालिका प्रशासनाने कापला आहे. दरम्यान, ही कारवाई करतानाच चुकीच्या पद्धतीने कर्मचाऱयांचा रोखलेला पगार लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे, तर या प्रकरणाच्या चौकशीनंतरच अधिकाऱयांचा कापलेला पगार दिला जाणार आहे. यामुळे पगार रोखलेल्या हजारो कर्मचाऱयांना दिलासा मिळाला आहे.
बायोमेट्रिक हजेरीत असणाऱया त्रुटींमुळे गेल्या काही महिन्यांपासून शेकडो कर्मचाऱयांचा पगार रोखला जात होता. त्यामुळे कर्मचारी समन्वय समितीने आयुक्तांची भेट घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली होती. शिवाय बायोमेट्रिक हजेरी पद्धतीमधील त्रुटी दूर करण्याची मागणीही करण्यात आली होती. यावेळी पालिका आयुक्तांनी जाणीवपूर्वक पगार रोखण्यास अधिकारी जबाबदार असतील तर त्यांचा पगार रोखण्याची कारवाई करू असे आश्वासन कामगार समन्वय समितीला दिले होते.





























































