आचारसंहितेचा भंग केल्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात तक्रार

सामना प्रतिनिधी। मुंबई

शेतकऱयांना पाच-दहा रुपयांचे चेक देताना सरकारला लाज कशी वाटत नाही अशा आशयाची जाहिरात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपच्या विरोधात प्रसारित केली आहे, पण ही जाहिरात पूर्णपणे खोटी व फसवी आहे. खोटय़ा जाहिरातींच्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भाजपने पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

भाजपचे प्रदेश सचिव व आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी व उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून एक निवडणूक जाहिरात दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित करण्यात येत आहे. त्यामध्ये भाजप महायुती सरकारने शेतकऱयांना पाच–दहा रुपयांचे चेक दिले असा खोटा दावा करण्यात आला आहे. अशा प्रकारे जाहिरात प्रसिद्ध करून लोकसभा निवडणुकीचे वातावरण दूषित केले आहे. या जाहिरातीमुळे काँग्रेस–राष्ट्रवादीने निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या