भाजपने केली राजकीय फायद्यासाठी मुंबईतील वॉर्डांची तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp

मुंबई महापालिका निवडणुकीतील राजकीय फायद्यासाठी भाजपने किमान 40 ते 50 वॉर्डची रचना बदलल्याचे काँग्रेसच्या सत्यशोधन समितीला प्राथमिक अभ्यासात आढळून आले आहे. मुंबई शहर व उपनगरात भाजपने गुजराती भाषिक प्राबल्यांचे वॉर्ड निर्माण केले आहेत. त्यामुळे 2022 मध्ये होणाऱया महापलिका निवडणुकीपूर्वी वॉर्डांची रचना तातडीने बदण्याची गरज असल्याचे काँग्रेसच्या अहवालात नमूद केले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी वॉर्डांची पुनर्रचना व आरक्षण बदलण्याच्या दृष्टीने काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते जनार्दन चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षांतर्गत सत्यशोधन समिती स्थापन केली. या समितीमध्ये पालिकेतील विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक रवी राजा, आमदार अमीन पटेल व धर्मेश व्यास सदस्य आहेत. या समितीने मुंबईतील सर्व 227 वॉर्डांच्या रचनेचा सविस्तर अभ्यास केला आणि त्यानंतर हा अहवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांना सादर केला आहे.

यापूर्वी 2007 मध्ये मुंबईत वॉर्डांची पुनर्रचना झाली त्यावेळी 2001 ची लोकसंख्या गृहीत धरली होती. तर 2017 मध्ये वॉर्डांची पुनर्रचना झाली त्यावेळी 2011 मधील लोकसंख्या गृहीत धरली होती. सर्वसाधारणपणे दहा वर्षांनंतर वॉर्डांची पुनर्रचना होते, पण कायद्यात अशी काही तरतूद नाही. वास्तविक पाच वर्षांनंतरही वॉर्डांची पुनर्रचना करता येते. 2017 मध्ये भाजप सरकारने वॉर्डरचना बदलली आणि भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढली असे आढळून आल्याचे काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचे सदस्य व पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. त्यावेळी किमान 40 ते 50 वॉर्डांच्या रचना भाजपला अनुकूल होतील अशा पद्धतीने तयार केले. मागील वेळेस पालिकेच्या शीव परिसरातील 168 क्रमांकाचे दोन वॉर्ड केले. त्यातील निम्मा वॉर्ड शीव-कोळीवाडय़ातील 176 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये समाविष्ट केला आणि 177 क्रमांकाचा नवीन वॉर्ड केला. यामध्ये गुजराती भाषिकांचे प्राबल्य असलेला वॉर्ड निर्माण केला. त्याच पद्धतीने माझगावमधील 200 क्रमांकाच्या व काळबादेवीतील 202 क्रमांकाची तोडफोड केली. काळबादेवीत गुजराती भाषिक भाषिकांचा वॉर्ड निर्माण केला असे रवी राजा म्हणाले. मुंबईत तीन चार वॉर्डांमध्ये हाच प्रकार केला. त्यानंतर पश्चिम उपनगरात वॉर्डची पुनर्रचना करीत वॉर्डची तोडफोड करीत भाजपला अनुकूल वॉर्डरचना केली. मुंबईच्या उपनगरात गुजराती भाषिकांची संख्या अधिक आहे. या आधारावर मुंबई शहरातल्या अकरा वॉर्डांची संख्या कमी करून उपनगरातील वॉर्डांची संख्या वाढवली.

वॉर्डांची पुनर्रचना करून भाजपने पक्षपात केला आहे. पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी वॉर्डांची तोडफोड केली आहे. याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मुंबई अध्यक्ष भाई जगताप हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करतील. महापालिका निवडणुका 2022 मध्ये आहेत. त्यासाठी ऑगस्टमध्ये तत्काळ वॉर्डांची पुनर्रचना घोषित करावी लागेल. यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घेऊन निवडणूक आयोगाला सूचना द्याव्या लागतील.
– रवी राजा, काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचे सदस्य