9000 चाचण्या, फक्त 700 पॉझिटिव्ह; तीन महिन्यांनंतर मुंबईकरांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बईत कोरोना नियंत्रणात येत असताना मंगळवारी गेल्या शंभर दिवसांतील कोरोनाबाधितांची निचांकी नोंद झाली आहे. विशेष म्हणजे तब्बल 8,776 चाचण्यांमध्ये केवळ 700 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली. ही घट अशीच कायम राहून मुंबईत कोरोना लवकरच पूर्ण आटोक्यात येईल, असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला.

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही दररोज वाढत असून मंगळवारी डबलिंग रेट 69 दिवसांवर पोहोचला आहे. तर सरासरी रुग्णवाढही 1.02 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, आयुक्त चहल यांनी सांगितले.

पालिकेच्या एच पूर्व म्हणजेच वांद्रे पूर्व विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सर्वात जास्त म्हणजेच 133 दिवसांवर पोहचला आहे. या विभागात 3251 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

सर्वाधिक चाचण्या मुंबईतच

मुंबईत दररोज होणारऱ्या चाचण्यांची संख्या आता 8776 वर पोहोचली असल्याचेही आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले. चाचण्यांची संख्या दररोज दहा हजारांवर नेण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. 26 जुलैपर्यंत मुंबईत 4 लाख 85 हजार 563 चाचण्या झाल्या.

मास्क उतरवू नका, आकडे कमी करायचे आहेत!

‘या पुढेही आपल्याला काळजी घ्यायची आहे. आरोग्य सुरक्षेत कोणतीही कुचराई करू नका, चेहऱ्यावरचा मास्क उतरवू नका, आपल्याला फक्त आकडे कमी करायचे आहेत, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘चेस द व्हायरस मॉडेल गेले काही आठवडे मुंबई महानगर प्रदेशातही वापरले जात असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. उर्वरित महाराष्ट्रातही करोना विरुद्ध लढाईला धार आणण्यासाठी अशाच प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.