विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र होणार, दंडातील 10 टक्के कमिशन कर्मचाऱ्याला मिळणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, विनामास्क फिरणाऱयांकडून पालिकेचे घनकचरा कर्मचारी 200 रुपये दंड वसूल करतात. मात्र, आता जे कर्मचारी हा दंड वसूल करणार आहेत त्यांना त्या दंडातील 10 टक्के कमिशन मिळणार आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱयांविरोधातील कारवाई अधिक तीव्र होणार आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, तोंडावर मास्क लावणे गरजेचे आहे. परंतु पालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सुरुवातीला विनामास्क फिरणार्यांकडून एक हजार रुपये दंड आकारण्यात येत होता. गेल्या आठवडयात तो कमी करून 200 रुपये करण्यात आला आहे. पण आता या मोहिमेत पालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱयांना रोज वसूल करण्यात येणाऱया रकमेतील 10 टक्के रक्कम कमिशन म्हणून मिळणार आहे. विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे हा पालिकेचा उद्देश नसून कोरोनाला रोखण्यासाठी लोकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

अतिरिक्त जबाबदारीसाठी कमिशन

घनकचरा विभागात काम करणारे कर्मचारी स्वतःचे काम पूर्ण झाल्यावर विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाईचे काम करणार आहेत. स्वतःचे काम सांभाळून त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळेच या कर्मचाऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी ते जो दंड वसूल करतील त्यातील 10 टक्के कमिशन देण्यात येत आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे मुख्य अभियंता अशोक यमगर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या