मुंबई महापालिका, अग्निशमन दल सतर्क, कोचिंग क्लासेसची ‘सूरत’ बदलणार !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

सुरतमध्ये शुक्रवारी कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या भीषण आगीत 23 विद्यार्थ्यांनी हकनाक प्राण गमावला. या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ आणि संताप व्यक्त होत असतानाच मुंबईतील कोचिंग क्लासही आता महापालिका आणि अग्निशमन दलाच्या रडारवर आले आहेत. महापालिकेने या क्लासेसची झाडाझडती सुरू केली असून अग्निशमन यंत्रणा नसणाऱया संस्थेची वीज-पाणी कापण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे क्लास चालकांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबईत अनेक ठिकाणी व्यावसायिक इमारतींमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश असलेले क्लास सुरू असल्याचे समोर आले आहे, मात्र यातील केवळ अकराशे शाळा, खासगी क्लास, पालिका-सरकारी शाळा अग्निशमन दलाकडे रजिस्टर आहेत. त्यामुळे खासगी इमारती, झोपडपट्टीमध्ये सुरू असणाऱया क्लासेसच्या निष्काळजीपणावर कसे नियंत्रण ठेवणार हे आव्हान पालिकेसमोर आहे. या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेच्या दृष्टीने रहिवासी इमारतींबरोबरच या व्यावसायिक इमारतींच्या अग्निसुरक्षेचे ऑडिट सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

…तर कोर्टात खेचणार

पालिकेच्या अधिनियमानुसार खासगी, व्यावसायिक आणि शैक्षणिक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा असणे बंधनकारक आहे, मात्र अनेक आस्थापने, सोसायटय़ा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.

अग्निसुरक्षा नसणाऱया क्लासेसना नोटीस दिल्यानंतर 120 दिवसांत आवश्यक कार्यवाही आणि उपाययोजना न केल्यास न्यायालयीन कारवाई होणार असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.

समितीने अहवाल देऊनही सहा महिने नियमावलीची प्रतीक्षा

मुंबईत साडेआठ हजारांवर खासगी क्लास असून मुंबई क्लास ओनर्स असोसिएशनकडे एक हजारावर संस्थाचालक रजिस्टर आहेत. या क्लासचालक आणि सरकारी अधिकाऱयांचा समावेश असणाऱया समितीने शासनाला नियमावली बनवण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी अहवाल दिला. मात्र याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सुरक्षा आणि कायदेशीररीत्या क्लास चालवण्यासाठी सरकारने नियमावली लवकरात लवकर जाहीर केली पाहिजे. क्लासचालकांनीही आपली जबाबदारी ओळखून अग्निसुरक्षा आणि इतर आवश्यक सर्व नियम पाळले पाहिजेत अशी अपेक्षा मुंबई क्लास ओनर्स असोसिएशनचे संस्थापक जगदीश वालावलकर यांनी व्यक्त केली.

व्यावसायिक किंवा खासगी ठिकाणी संबंधितांनी आग प्रतिबंधक यंत्रणा सक्षमरीत्या तैनात ठेवणे अनिवार्य असते, मात्र अनेक ठिकाणी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाकडून मुंबईत तपासणी सुरू असून कारवाई करण्यात येत आहे. मुंबईकरांनी स्वतःची जबाबदारी ओळखून अशी यंत्रण सक्षम ठेवली पाहिजे आणि अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱयांची तक्रार पालिकेकडे केली पाहिजे.
डॉ. प्रभात रहांगदळे, मुंबई अग्निशमन दलप्रमुख

क्लासेसना प्रवेश घेण्यापूर्वी हे तपासा
कोचिंग क्लास ज्या इमारतीत आहे त्या इमारतीचे बांधकाम.
क्लासमध्ये आग नियंत्रण व्यवस्था बसविण्यात आली आहे का?
इलेक्ट्रिक बॉक्सची फिटिंग.
कोचिंग क्लासमध्ये ये-जा करण्याची व्यवस्था.

बालवाडय़ांबरोबरच खासगी क्लासेसवाल्यांवर सरकारचे नियंत्रण नाही. क्लासचालक विद्यार्थ्यांकडून किती फी आकारतात, एका क्लासमध्ये किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो याची कोणतीही माहिती सरकारदरबारी उपलब्ध नाही.

कोचिंग क्लासेसची नोंदणी सक्तीची

दरवर्षी असंख्य कोचिंग क्लास नव्याने जन्माला येतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तरी या क्लासेसची सरकारने नोंदणी करायला हवी असे मत पॅरेंटस् टीचर्स असोसिएशनच्या अरुंधती चव्हाण यांनी व्यक्त केले. पालिका शिक्षण विभागाने मुंबईतील शाळांचे सेफ्टी ऑडिट सक्तीचे केले आहे. याच धर्तीवर नोंदणीकृत क्लासेसवरही सेफ्टी ऑडिटची सक्ती करावी. क्लासेसना नोंदणी सक्तीची केल्याने सुरक्षेचे नियम पाळले जातील.