पालिकेचे हायटेक जलशुद्धीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc

संपूर्ण देशात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यामध्ये सर्वोच्च स्थानी असलेली मुंबई महानगरपालिका आता पिसे पांजरापूर जल प्रक्रिया केंद्राचे आधुनिकीकरण करणार आहे. त्यासाठी प्रयोगशाळेत नवीन उपकरणे लावली जाणार आहेत. त्यामुळे यापुढेही मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा अविरत पुरवठा सुरू राहणार आहे.

मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करताना मुंबई महानगर पालिका नेहमीच दक्ष असते. पालिका पाण्याच्या दर्जाबद्दल कधीच तडजोड करत नाही.  पिसे पांजरापूर जल प्रक्रिया केंद्रातून 55 टक्के मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो. पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया अखंडित सुरू असते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी या केंद्रातल्या प्रयोगशाळेचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.

पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पातील प्रयोगशाळेत पिण्याच्या पाण्याची तपासणी होते. या जलप्रक्रिया केंद्रातील केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी येवई येथील जलाशयाद्वारे मुंबईकरांना पुरवले जाते. मे. ऍटलांटा इंडस्ट्रियल कार्पोरेशन हे पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात उपकरणांचा पुरवठा करणार असून त्यासाठी 1 कोटी 8 लाख 58 हजार रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव आला असून 27 नोव्हेंबरला यावर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

दुरुस्तीऐवजी नवी उपकरणे का? 

प्रयोगशाळेतील उपकरणे पाण्यातील भौतिक, रासायनिक आणि सूक्ष्म जैविक घटक तपासतात. पण आता नव्या आयएसओ 9001ः2015 चे निकष पूर्ण करण्यासाठी प्रयोगशाळा अद्ययावत केली जाणार आहे. काही उपकरणांचा दुरुस्ती खर्चही  मोठा आहे. त्यामुळे ती बदलण्यात येणार असल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली.