पावसाळय़ात पाणी तुंबण्याचे टेन्शन नाही, नालेसफाईचे 90 टक्के काम पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा सुरू होण्यास काही दिवस राहिले असले तरी पालिकेच्या माध्यमातून मुंबईत नालेसफाईचे 90 टक्क्यांहून जास्त काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मुंबई शहर विभागात 96.06 टक्के, पूर्व उपनगरात 91.30 टक्के आणि पश्चिम उपनगरात 94.01 टक्के काम पूर्ण झाले आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली. या कामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे टेन्शन राहणार नाही.

मुंबई महानगरपालिका गेल्या वर्षभरापासून कोरोना रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहे. यासाठी पालिकेने संपूर्ण यंत्रणा कामाला लावून जानेवारीअखेरपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट आल्याने पावसाळापूर्व कामांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र मुंबईकरांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक यंत्रणा वेगाने काम करीत असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. यामध्ये आतापर्यंत 90 टक्क्यांहून जास्त काम पूर्णही झाले आहे. या वर्षीच्या नालेसफाईसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. यामध्ये शहरातील ब्रिटिशकालीन नाल्यांची सफाई करण्यासाठी स्वयंचलित रोबाटिक सीसीटीव्ही पॅमेरा सोडून पाहणीनुसार काम केले जात आहे. तर मिठी नदीच्या सफाईसाठी नदीच्या खोल भागात जाऊन समान पातळीवर गाळ काढण्यासाठी नेदरलॅण्डची टक्शर एम्फिबिअस मशीन तर नदीच्या कानाकोपऱयात जाऊन तरंगत्या कचऱयाची सफाई करणारी स्वीडनची सिल्ट पुशर मशीन वापरली जात आहे.

छोटय़ा नाल्यांचे आव्हान

मुंबईत मोठय़ा नाल्यांची सफाई झाली असली छोटय़ा नाल्यांची सफाई पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. छोटय़ा नाल्यांची 52.93 टक्के सफाई आतापर्यंत झाली आहे. मात्र पालिकेने छोटय़ा नाल्यांची सफाई पावसाळ्याआधी पूर्ण केली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, आतापर्यंत मिठी नदीमधील गाळ काढण्याचे काम 65.64 टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्याआधी हे काम पूर्ण होईल असे पालिकेने म्हटले आहे.

असे होतेय काम

  • मुंबईच्या एकूण 100 टक्के नालेसफाईपैकी 75 टक्के काम पावसाळ्याआधी, 10 टक्के पावसाळ्यात आणि 15 टक्के काम पावसाळ्यानंतर करण्यात येते.
  • मुंबईत दरवर्षी 10 एप्रिलला नालेसफाईचे काम सुरू केले जाते. मात्र या वर्षी एक महिना आधीच म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवडय़ातच नालेसफाईला सुरुवात करण्यात आली.