तलाव तुडुंब भरले तरी पाण्याची बोंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Dripping tap, light blue illustration with light shadows isolated on white background.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव या वर्षी तुडुंब भरले असले तरी अनेक वॉर्डांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ऐन दिवाळीतही पुरेसे पाणी मिळाले नसल्याने अनेकांची प्रचंड गैरसोय झाली. त्यामुळे शिवसेनेसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबरला तलावांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो. यामध्ये सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी 14,47,363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते, मात्र गेल्या वर्षी 2 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी असल्याचे समोर आल्यामुळे पालिकेने नोव्हेंबर 2018 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात सुरू केली होती. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात पाणीटंचाई मागे घेतली. या वर्षी तलावक्षेत्रांत जोरदार पाऊस झाल्याने सातही तलाव तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे मुंबईकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही अशी आशा व्यक्त होत होती, मात्र सध्या मुंबईत अनेक भागांत पाणीटंचाई असल्याचे नगरसेवकांनी स्थायी समितीत पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. शिकसेना नगरसेकिका किशोरी पेडणेकर यांनी याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. घाटकोपर, कुलाबा, भांडुप, वर्सेवा, परळ, कुर्ला आदी ठिकाणी पाणीसमस्येला नागरिकांना कसे तोंड द्यावे लागते आहे याबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला फैलावर घेतले. पाणीसमस्येबाबत रहिवाशांच्या तक्रारीकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याबद्दल नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. तलावांत पुरेसा पाणीसाठा असूनही पाणीटंचाईचे नेमके कारण काय याचा प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी किशोरी पेडणेकर, रमेश कोरगावकर, विजय शिंदे, राजूल पटेल, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव आदींनी उपस्थित केला.

स्थायी समिती अध्यक्ष करणार पाहणी

तलावांत पुरेसा पाणीसाठा असताना पाणीपुरवठय़ाचा गोंधळ नेमका कोणत्या कारणांमुळे सुरू आहे याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. शिवाय पाणीसमस्येचे नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी आपण स्वतः ज्या ज्या ठिकाणी पाणीपुरवठय़ात समस्या आहे त्या त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार असल्याचेही ते म्हणाले.