अवघ्या चार महिन्यांमध्ये ‘सँडहर्स्ट रोड’ रेल्वे स्थानक नजीकच्या रेल्वेमार्गाखालून पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या आणि मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे केलेल्या कौशल्यपूर्ण अभियांत्रिकीय कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टी दरम्यान सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले नाही. यासाठी रेल्वे ट्रॅकच्या खालून तब्बल 415 मीटर लांबीची आणि 1800 मिलिमीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी मध्यरेल्वेद्वारे टाकण्यात आली. तर ही पर्जन्यजल वाहिनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनी ला जोडण्यासाठी रेल्वे हद्दीच्या पुढील भागात 25 मीटर लांबीची एक अतिरिक्त ‘बॉक्स ड्रेन’ महानगरपालिकेच्या वतीने टाकण्यात आली आहे. ‘बाॅक्स ड्रेन’ बांधण्यात आलेल्या ठिकाणी असणाऱ्या टाटा कंपनीच्या अतिउच्च दाब क्षमतेच्या विद्युत वाहिन्या आणि मोठ्या जलवाहिन्या यामुळे हे कार्य अत्यंत आव्हानात्मक होते. तथापि मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी हे काम अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने व अल्पावधीत पूर्ण केले आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू म्हणाले की, मुंबई महानगरपालिका व मध्य रेल्वे यांनी अत्यंत चांगला समन्वय साधून केवळ 4 महिन्यांच्या कालावधीत एकूण तब्बल 440 मीटर लांबीच्या व दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पर्जन्य जलवाहिन्या बांधण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण केले आहे. या कामासाठीचा सर्व खर्च मुंबई महानगरपालिकेने केला आहे, असे वेलरासू ह्यांनी नमूद केले.

अधिक तपशील देताना पुढे ते म्हणाले की, मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वे रुळांवरील पावसाळी पाणी साचण्याच्या ठिकाणी मायक्रो टनेलिंगचे काम रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. त्यासाठी आवश्यक त्या त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका देखील आपल्या हद्दीत काम करीत आहे. दक्षिण मुंबईतील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकानजीकच्या परिसरात दर वर्षी अतिवृष्टी दरम्यान पाणी साचून रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अभियंत्यांनी व मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे अभ्यास करून, फक्त नाल्यांवर अवलंबून न राहता, ‘रेल्वे ट्रॅक’च्या खाली ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीने रेल्वे हद्दीतील पर्जन्य जलवाहिनी तयार करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन मार्ग खुला होणार होता. यानुसार मार्च 2021 पासून हे काम हाती घेण्यात आले. त्यात 415 मीटर लांबीची व 1800 मिलीमीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी ही अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून व ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीने बांधण्यात आल्यामुळे रेल्वे वाहतूकीला कोणताही अडथळा न येता सदर कौशल्यपूर्ण अभियांत्रिकीय काम करता येऊ शकले. हे काम पूर्ण करताना वेगवेगळ्या आव्हानांवर यशस्वीपणे मात करण्यात आली, मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने त्यासाठी योग्य ताळमेळ ठेवला, असे वेलरासू ह्यांनी नमूद केले.

पुढे ते म्हणाले की, रेल्वे हद्दीतील पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे पाणी वाहून जाण्यासाठी नवीन मार्ग तयार झाल्यानंतर, खरी गरज होती ती महानगरपालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडणी करण्याची. कारण त्याशिवाय पाण्याचा निचरा होणे शक्यच नव्हते. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत 25 मीटर लांबीची ‘बॉक्स ड्रेन’ टाकून नवीन पर्जन्य जलवाहिनी महापालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता पथकाद्वारे करण्यात आलेले हे काम देखील अत्यंत आव्हानात्मक व कौशल्यपूर्ण होते. यामध्ये पी. डि’मेलो मार्गावर रेल्वे आयुक्त कार्यालय प्रवेशद्वारापासून मॅलेट बंदर जंक्शन पर्यंत सुमारे 25 मीटर अंतरात पर्जन्य जल वाहून नेण्यासाठी प्रारंभी रेल्वे प्रशासनाकडून 1800 मिमी व्यासाचा भूमिगत बोगदा (मायक्रो टनेलिंग) बांधण्यात येणार होता. मात्र नागरी उपयोगिता सेवांचे जाळे पाहता, रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेला ही काम करण्याची विनंती केली. त्यास मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल ह्यांनी मंजुरी दिल्यानंतर महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने हे काम हाती घेतले. पी डिमेलो मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने वाहतूक विभागाची ना-हरकत प्राप्त करून दिनांक 15 एप्रिल 2021 रोजी हे काम सुरू करण्यात आले.

या ठिकाणी 220 किलोवॅट क्षमता असलेली उच्च दाबाची टाटा कंपनीची विद्युत वाहिनी, 110 किलोवॅट क्षमता असलेली उच्च दाबाची टाटा कंपनीची विद्युत वाहिनी, बेस्ट विद्युत पुरवठ्याच्या वाहिन्या तसेच 750 मिमी व्यासाच्या दोन मुख्य पेय जल वाहिन्या, 600 मिमी व्यासाच्या दोन मुख्य पेय जल वाहिन्या, 450 व्यासाच्या दोन मुख्य पेय जल वाहिन्या अशा वेगवेगळ्या उपयोगिता सेवा वाहिन्या आहेत.

या सर्व उपयोगिता सेवांना कोणतीही क्षती न पोहोचविता, 2.1 मीटर बाय 2.1 मीटर आकाराची पर्जन्यजल पेटिका वाहिनी (बॉक्स ड्रेन) अवघ्या दोन महिन्यात बांधून दिनांक 15 जून 2021 रोजी हे काम पूर्ण करण्यात आले. मॅलेट बंदर जंक्शन वरील 2200 मिमी व्यासाच्या पर्जन्य जल वाहिनीला सदर पेटिका वाहिनी जोडण्यात आली आहे. परिणामी पी डिमेलो मार्गावरील पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासह सॅंडहर्स्ट रेल्वे स्थानकावर पावसाळी पाणी साचण्याची स्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे, असेही वेलरासू ह्यांनी अखेरीस नमूद केले.

वेगवेगळ्या आव्हानांवर मात करून अल्पावधीत उत्कृष्टपणे हे काम पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त  इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू ह्यांच्या निर्देशानुसार, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) राजन तळकर यांच्यासह पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता कमलापुरकर, उप प्रमुख अभियंता विवेक राही, कार्यकारी अभियंता युवराज राऊत, दुय्यम अभियंता स्नेहल जाधव आणि श्रीकांत गोधडे यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

रेल्वे प्रशासनाच्या वतीने सीनिअर डिविजनल इंजिनिअर (दक्षिण) अर्पण कुमार, असिस्टंट डिविजनल इंजिनिअर (भायखळा) मनीष सिंग, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (भायखळा) अरुण कुमार, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (भायखळा) निशांत कुमार सिंग, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (परळ) संजय पारधी, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (सीएसएमटी) मोहम्मद एजाज आलम, कार्य प्रभारी (भायखळा) तरूण कुमार या अभियांत्रिकी पथकाने यात योगदान दिले आहे.