आरोप सिद्ध करा, अन्यथा माफी मागा! शिवसेनेचे भाजपला खुले आव्हान

स्थायी समितीकडून पक्षांना दिल्या जाणाऱया विकास निधीवाटपावरून शिवसेनेवर नाहक आरोप करणाऱया भाजपला शिवसेनेने थेट आव्हान दिले आहे.भाजपने केलेले आरोप सिद्ध करावेत, अन्यथा नाहक बदनामी केल्याप्रकरणी जाहीर माफी मागावी असे आव्हानच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहे.

यावर्षी अर्थसंकल्पातून स्थायी समितीला 650 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमधील 230 कोटी शिवसेनेला, काँग्रेसला 81 कोटी तर भाजपला केवळ 60 कोटी दिले असून 30 कोटी रुपये स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्वतःच्या प्रभागासाठी घेतल्याचा आरोप भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी ट्विटरवरून केला आहे. याचा समाचार घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शेलार यांना थेट आव्हान दिले. शेलार यांनी केलेले आरोप अज्ञानातून केल्याचे जाधव म्हणाले. शिवसेना मुंबईकरांसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळेच सलग 25 वर्षे मुंबईकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखवत पालिकेची सत्ता दिली आहे. ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’च्या धनदांडग्यांसाठी काम करण्याचा धंदा भाजपचा असल्याचा आरोपही जाधव यांनी केला. निधीवाटपावरून भाजपने थयथयाट करणे थांबवावे असेही जाधव यांनी म्हटले आहे.

पालिकेतील भाजप नेते अकार्यक्षम

गेल्या वर्षी भाजपला 173 कोटी रुपये देण्यात आले. यावर्षी 153 कोटी देण्यात आले आहेत. असे असताना शेलार शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आरोप करीत आहेत का, असा सवाल जाधव यांनी केला. शेलार आमदार असताना पालिकेत जास्त लक्ष देत असल्यामुळे भाजपचे पालिकेतील नेते अकार्यक्षम आहेत का, असा प्रश्नही जाधव यांनी उपस्थित केला. या निधीचे वाटप गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेमध्ये होते. त्यामुळे शेलार यांचे आरोप निरर्थक असून केवळ कोणताच मुद्दा नसल्याने पोटदुखीतून केलेले आहेत, असेही जाधव म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या