मुंबईकरांची भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना भटक्या कुत्र्यांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेकडून निर्बीजीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक संस्थांना निर्बीजीकरणासाठी येणाऱया खर्चाच्या दरातही वाढ करण्यात येणार आहे. त्यानुसार तीन वर्षांत सुमारे 98 हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

मुंबई महापालिका भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सामाजिक संस्थांकडून हजारो कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम दरवर्षी राबवते. त्यानुसार गेल्या 6 वर्षांत सामाजिक संस्थांच्या मदतीने 90 हजार 703 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले. मात्र निर्बीजीकरणाचा हा वेग कमी असून कुत्र्यांच्या जननदराचा विचार करता भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी अधिक वेगाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत केंद्र सरकारच्या ऑनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने व्यक्त केले आहे. त्यानुसार भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी 3 वर्षांत एकूण कुत्र्यांच्या संख्येच्या 70 टक्के निर्बीजीकरण करणे गरजेचे आहे, असे निर्देश दिले आहेत. मुंबईतील सुमारे 1 लाख 40 हजार कुत्रे असून 70 टक्क्यांप्रमाणे 98 हजार कुत्र्यांचे 3 वर्षांत मुंबई महापालिका आणि सामाजिक संस्थांमार्फत वर्षाला 32 हजार 700 कुत्र्यांचे निर्बीजीकरण पालिका आणि सामाजिक संस्था करणार आहे.

प्रत्येक कुत्र्यामागे 400 रुपयांची वाढ

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी प्रत्येक कुत्र्यासाठी सामाजिक संस्थांना देण्यात येणाऱया दरात 400 रुपयांची वाढ करणार येणार आहे. ही मोहीम राबवताना संस्थांना इंधन, मनुष्यबळ आणि कुत्रे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱया उपकरणांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे हा दर वाढवून देण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांत 98 हजार 100 कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी प्रत्येक कुत्र्यामागे 1 हजार 365 रुपये याप्रमाणे 7 संस्थांवर 13 कोटी 39 लाख 41 हजार 600 रुपये खर्च केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

निर्बीजीकरण करणाऱया संस्था

 द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज, महालक्ष्मी
 द बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रूएलटी टू ऑनिमल, देवनार
 इन डिफेन्स ऑफ ऑनिमल्स, देवनार
 अहिंसा, मालाड
युनिव्हर्सल ऑनिमल्स वेल्फेअर सोसायटी, मालाड
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ