मुंबईकरांना मिळणार मुबलक पाणी; गारगाई धरण प्रकल्पाला गती

293

मुंबईच्या वाढणाऱ्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी आणि मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून पालघरमधील गारगाई प्रकल्पाला गती देण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. त्यानुसार गारगाई धरण आणि बोगदा प्रकल्पाच्या सविस्तर अभियांत्रिकी आणि बांधकामाच्या देखरेखीसाठी सल्लागार म्हणून पालिकेने ऑस्ट्रेलियन कंपनीची निवड केली आहे. स्थायी समितीत आगामी बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना दररोज 440 दशलक्ष लिटर जादा पाणी उपलब्ध होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने मुंबईची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेत डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली दूरगामी धोरण ठरवण्यासाठी समिती स्थापन केली. समितीच्या अहवालानुसार, 2041 पर्यंत मुंबईची अंदाजित लोकसंख्या 17.24 दशलक्ष होणार असून या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी प्रतिदिन 5940 दशलक्ष लिटर्स एवढी अपेक्षित आहे. मुंबईकरांना दररोज 3,958 दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा पुरवठा केला जातो. पालघर जिह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावानजीक गारगाई नदीवर 69 मीटर उंचीचे आणि 972 मीटर लांबीचे धरण बांधण्यात येत आहे. त्याचबरोबर आदान मनोऱयाचे बांधकाम तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशयादरम्यान अंदाजे 2 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे बांधकाम केले जाणार आहे.

दरम्यान, या प्रकल्पाच्या सविस्तर अभियांत्रिकी आणि बांधकाम देखरेखीच्या कामासाठी सल्लागार म्हणून स्मेक इंटरनॅशनल पीटीवाय लिमिटेड या ऑस्ट्रेलियन कंपनीची आंतरराष्ट्रीय निविदेद्वारे निवड करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या आगामी बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय सल्लागाराची निवड का?

गारगाई प्रकल्पाच्या प्राथमिक अभियांत्रिकीची कामे अंतिम टप्प्यात असल्याने गारगाई धरण आणि बोगदा प्रकल्पासाठी सविस्तर अभियांत्रिकी व बांधकामाच्या देखरेखीसाठी सल्लागारांच्या नियुक्तीसाठी निविदा मागवण्यात आल्या. गारगाई प्रकल्पअंतर्गत गारगाई नदीवर रोलर कॉम्पेक्टेड काँक्रीट (आरसीसी) या तंत्रज्ञानावर आधारित धरण बांधण्यात येणार आहे. मात्र, हिंदुस्थानात या तंत्रज्ञानावर आधारित केवळ तीन धरणे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बोली तत्त्वावर सल्लासेवेच्या निविदा मागवण्यात आल्या. पाचपैकी दोन निविदाकारांना अपात्र ठरवण्यात आले तर ऑस्ट्रेलियातील स्मेक इंटरनॅशनल पीटीवाय, स्वित्झर्लंडमधील लोम्बारडी इंजिनीअर आणि हिंदुस्थानची टाटा कन्सल्टन्सी इंजिनीअर्स अशा तीन कंपन्या होत्या. त्यातून सर्वात कमी 16 कोटींची निविदा भरणाऱया स्मेक इंटरनॅशनल पीटीवाय लिमिटेड या ऑस्ट्रेलियन कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही कंपनी हिंदुस्थानात 1996 पासून व्यवसाय करत आहे. व्हिएतनाम, मलेशिया तसेच आफ्रिका आणि पूर्व आशियातील आरसीसी धरणाच्या देखरेखीचे काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या