19 वर्षांच्या आयुषने दिले चौघांना जीवनदान, ब्रेनडेड मुलाच्या अवयवांचे दान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या विवंचनेत असतानाच सात रस्ता येथील संतोष पाटणकर यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. खारघरच्या पुलावर त्यांचा 19 वर्षांचा मुलगा आयुषला जीवघेणा अपघात झाला. या अपघातात आयुष ब्रेनडेड झाला. संपूर्ण कुटुंब प्रचंड हादरले होते. पण अशा परिस्थितीतही ब्रेनडेड मुलाच्या अवयवांचे दान करून आयुषला अवयवांच्या रूपात जिवंत ठेवण्याचा धीरोदत्त निर्णय पाटणकर कुटुंबीयांनी घेतला.

आयुष व त्याचा मित्र रुचित जाधव हे दोघे 11 एप्रिलला मोटारीने पनवेलच्या दिशेने निघाले होते. संध्याकाळी 4.30 च्या सुमारास खारघर पुलावर त्यांच्या मोटारीला भीषण अपघात झाला. मुंबईच्या दिशेने बेफाम वेगाने येणाऱया एक बीएमडब्ल्यू कारने रस्त्यावरील दुभाजक तोडला आणि विरुद्ध दिशेने येणाऱया आयुष व रुचित जाधवच्या मोटारीला धडक दिली. या जीवघेण्या अपघातात आयुष व रुचित दोघेही जखमी झाले. उपचारांसाठी त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. नंतर मुंबई सेंट्रल येथील व्होकार्ट रुग्णालयात दाखल केले. आयुषच्या लहान मेंदूला मार लागल्याचे निष्पन्न झाले. दुसऱया दिवशी डॉक्टरांनी सर्व चाचण्याअंती आयुषला ब्रेनडेड घोषित केले. विद्यालंकार कॉलेजमध्ये बीएमएमचे शिक्षण घेणारा आयुष अतिशय उमदा व होतकरू युवक होता. ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच पाटणकर कुटुंबीयांवर प्रचंड मानसिक आघात झाला. पण अशा परिस्थितीतही संतोष पाटणकर, त्यांची पत्नी व धाकटय़ा मुलाने सल्लामसलत करून आयुषचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. प्रख्यात हृदय प्रत्यारोपणतज्ञ डॉ. अन्वय मुळे यांनी आयुषच्या अवयवांचे प्रत्यारोपण अन्य रुग्णांत केले. आयुष आमच्यातून गेला तरी अवयवांच्या रूपातून तो जिवंत असल्याचे त्यांचे वडील संतोष पाटणकर सांगतात.

अवयवदानानंतर डोळ्याच्या रूपातून ती व्यक्ती जिवंत राहते, हृदयाने काम करू शकते. मृत्यू झालेल्या व्यक्तीला अवयवाच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य अवयवदानाच्या रूपातून होते. – डॉ. अन्वय मुळे, हृदय प्रत्यारोपणतज्ञ