मुंबईतील सर्व पुलांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेणार, शिवसेनेच्या जोरदार मागणीमुळे पालिका प्रशासनाचे आश्वासन

437
bmc-2

मुंबईत अनेक पुलांचे बांधकाम-दुरुस्ती सुरू असल्याचे  पालिका प्रशासनाकडून सांगितले जात असताना दुर्घटना घडण्याचे प्रकार सुरूच आहेत. दादरच्या टिळक पुलाचा स्लॅब कोसळल्याने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुलांची नेमकी स्थिती प्रशासनाने ताबडतोब स्पष्ट करावी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव दिले. यावेळी मुंबईतील सर्व पुलांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केले.

पालिकेच्या माध्यमातून नवीन पुलांची बांधणी-दुरुस्ती सुरू आहे. असे असताना दररोज हजारोंची वर्दळ असणाऱ्या दादरच्या टिळक पुलाचा स्लॅब पुन्हा कोसळल्याने मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. टिळक पुलाला आता 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे कमकुवत झालेल्या पूल कोसळल्यास पुलाखालून रेल्वे मार्ग असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली. टिळक पुलासाठी रूपारेल ते रुईया कॉलेजदरम्यान पर्यायी पूल बांधावा असा पर्यायही त्यांनी सुचवला. शिवसेनेच्या हरकतीच्या मुद्दय़ाला विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह राष्ट्रवादी, ‘सपा’चे गटनेते, नगरसेवकांनी पाठिंबा देतानाच पालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली. टिळक पूल दुरुस्तीच्या कामात दिरंगाई करणारे प्रशासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा सवालही यावेळी उपस्थित केला. दरम्यान, टिळक पुलाचे बांधकाम-दुरुस्ती करताना प्रवाशांसाठी कोणत्या पर्यायी व्यवस्था करणार याची माहिती स्थायी समितीत लेखी स्वरूपात सादर करावी असे निर्देश यावेळी यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

भाजपने ‘सभाशास्त्र’ पाळावे

एकीकडे पूल वेगाने बांधा अशी मागणी करणाऱ्या भाजप नगरसेवकांनी मुंबईकरांसाठी महत्त्वपूर्ण आणि हिताचा असणाऱ्या हँकॉक पुलाच्या कामाच्या प्रस्तावाला वाढीव खर्च असल्याचे सांगत विरोध केला. मात्र लोकहितासाठी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपाच्या जोरदार पाठिंब्यामुळे प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची मागणी फेटाळून लावत 51 कोटींच्या मूळ प्रस्तावासह वाढीव 26 कोटींचा प्रस्ताव मंजूर केला. यावेळी भाजप नगरसेविका राजश्री शिरवडकर, ज्योती अळवणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष बोलू देत नसल्याचे सांगत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याची गंभीर दखल घेत भाजपने स्थायी समितीत  ‘सभाशास्त्र’ पाळावे अशा सूचना अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिल्या. स्थायी समिती आणि अध्यक्षांशी बोलताना संयम बाळगावा, अध्यक्षांचा अवमान होईल अशी भाषा वापरू नये असे सांगतानाच भाजपने दुटप्पी भूमिका सोडावी असा टोलाही लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या