भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळला, दोन ठार

मुंबईकरांसाठी गुरूवारचा दिवस दुर्दैवी ठरला. भायखळा येथे दुपारी दोन मजली इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर विक्रोळीत लिफ्ट कोसळून दोन कामगार ठार झाले. दरम्यान, देवनार आणि चेंबूरमध्ये घराचा भाग अंगावर कोसळून झालेल्या अपघातात दोन महिला जखमी झाल्या.

भायखळा येथे आयेशा कंपाऊंडमधील शुक्लाजी मार्गावरील मिश्रा इमारतीचा शौचालयासह काही भाग दुपारी एक वाजता कोसळला. यात आलिया कुरेशी (12) आणि नूर कुरेशी (70) यांना बाहेर काढून जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एका जखमीवर जे.जे.मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पुर्निवकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे निर्देश महापौरांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विक्रोळी कन्नमवारनगर येथे म्हाडा बांधत असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. भोला यादव (३०) इतवारी यादव (३५) अशी त्यांची नावे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या