
चार दिवसांपूर्वी चारकोप येथे शेअर ब्रोकरला वाहनांची धडक देऊन पळालेल्या चालकाला अखेर चारकोप पोलिसांनी अटक केली. प्रवीण मिश्रा असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चारकोप येथे राहणारे सचिन पटेल हे शेअर ब्रोकरचे काम करायचे. 26 जानेवारीला सचिन हे त्यांचा भाऊ गोपाळसोबत घरी जात होते. गणेश चौक येथून जात असताना सचिनला वाहनाने धडक दिली. त्या धडकेत सचिन हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्या वाहनात बसलेल्या प्रवाशाने सचिनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले.






























































