
निवडणूक कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांचा मतदार म्हणून मतदानाचा हक्क डावलला जाऊ नये यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुंबईतील हजारो कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱयांची मोठय़ा संख्येने नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱयांना त्यांचे निवासस्थान असलेल्या प्रभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत, मात्र मुंबईत बऱयाच ठिकाणी ही सुविधा अद्यापही उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रभागांच्या निवडणूक कार्यालयात तर याबाबतचे आदेश मिळाले नसल्याचे सांगून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना परत पाठविले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
ज्येष्ठांवरही अन्याय
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ वयोवृद्ध आणि दिव्यांगांना घरून मतदानाची सुविधा देण्यात आली होती. महापालिका निवडणुकीत अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. हा एक प्रकारे अन्याय असल्याची भावना मतदारांत आहे.
मतदानाचा हक्क डावलला जातोय
लोकशाही प्रक्रियेत मतदान करणे हा आमचा हक्क आहे, मात्र निवडणुकीच्या कामात सहभागी कर्मचाऱयांचा मतदानाचा हक्क डावलला जात आहे. लोकसभा, विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणुकीतही टपाली मतदानास सहकार्य केले जात नसल्याची तक्रार मुंबईतील सेंट स्टिफन हायस्कूल येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे.



























































