मुंबईला ताप, तापमानाचा पारा चढला, तापसरीचे रुग्णही वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या ‘इन्फ्लुएन्झा’ने दोन बळी घेतल्यानंतर धोका वाढला असताना मुंबईतही पालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सर्दी-तापाच्या रुग्णांचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढले आहे. एकीकडे मुंबईकर वाढलेल्या प्रदूषणात उकाडय़ाने हैराण झाले असताना तापाचे रुग्णही वाढू लागल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येत लहान मुले, वृद्ध आणि सहव्याधी असणाऱयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

– मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेले प्रदूषण आणि वातावरणात अचानक होणाऱया बदलांमुळे श्वसनाचे आजार असलेल्यांना ‘व्हायरल इन्फेक्शन’ लवकर होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सध्या रुग्णालयात येणाऱया रुग्णांमध्ये अशाच रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

सर्दी-तापाच्या रुग्णांची वाढलेली संख्या पाहता लक्षणे असलेल्यांनी, सहव्याधी असणाऱयांनी आणि श्वसनाचे आजार असणाऱयांनी काळजी घ्यावी. गरम पाणी पिणे, मास्क वापरणे, स्वच्छता राखणे फायद्याचे ठरेल.
– डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, शीव रुग्णालय

गर्दीत जाऊ नका, मास्क वापरा!

जे.जे. रुग्णालयात दररोज एकूण अडीच ते तीन हजार रुग्ण येत असतात. यामध्ये सध्या सुमारे 300 रुग्ण वाढले असून यात सर्दी-तापाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. म्हणूनच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क वापरावे, वारंवार हात धुवावेत, असे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

राज्यात विजेची रेकॉर्डब्रेक मागणी

राज्याच्या विजेच्या मागणीत तब्बल 28043 मेगावॅट एवढी रेकॉर्डब्रेक मागणी नोंदली आहे. होळीनंतर तापमानात झपाटय़ाने वाढ झाली आहे. त्यामुळे विजेच्या दैनंदिन वापरातही मोठी वाढ झाली आहे. महावितरणकडे 24 हजार 691 मेगावॅट एवढी विक्रमी तर मुंबईत 3300 मेगावॅट एवढी मागणी नोंदली आहे.