सूर्य हरवला; मुंबईत संध्यापर्व! मुंबईकरांचा खो, खो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांची ख्रिसमसची पहाट उगवली ती प्रचंड मळभ, धुरके घेऊन… दिवसभर जणूकाही ढगाळ चादर मुंबईवर पसरली होती . प्रचंड धुरक्यामुळे काही अंतरावरचे काहीच दिसेनासे झाले. जॉगिंग ट्रकवरही मुंबईकरांची फारशी गर्दी नव्हती. सुट्टीचा दिवस असल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसच आळसात उगवला. सूर्य ढगांच्या गर्दीत हरवलेला दिसला. दिवसभर जणू ‘संध्यापर्व’ सुरू होते.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुंबईची हवा खराब झाली असून मुंबईकर सर्दी, खोकला, शिंकांनी अक्षरशः हैराण झाले आहेत. खशात खवखव, डोळय़ांची जळजळ, आवाज बदलणे, नाकातून पाणी येणे, ताप येणे, घसा धरणे अशा तक्रारी असून दवाखाने, रुग्णालयांच्या ओपीडींमध्ये गेल्या आठवडाभरापासून रुग्णांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. आज बुधवारी या रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाल्याचे केईएमच्या ईएनटी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ.नीलम साठय़े यांनी सांगितले.

या गोष्टी करा…
पाणी उकळून प्या. कोमट पाणी घ्याल तर उत्तम. एसी, गर्दीची ठिकाणे टाळा, थंड पदार्थ खाऊ नयेत. कोल्ड्रिंक्स घेऊ नका. घरात स्वच्छता ठेवा. फर्निचर, घरातील इतर साहित्य ओल्या कपडय़ाने वारंवार पुसून घ्या. धुळीच्या ठिकाणी जाऊ नका.

दम्याच्या रुग्णांना जास्त त्रास
दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांना अशा प्रदूषित वातावरणाचा जास्त त्रास होऊ शकतो, असे केईएमच्या ईएनटी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ.नीलम साठय़े यांनी सांगितले. दम्याच्या रुग्णांचीही रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये लक्षणीय संख्या असल्याचे त्या म्हणाल्या. गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला, नाकातून पाणी येणे अशा तक्रारी घेऊन अनेकजण आपल्याकडे येत आहेत. अनेकांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रारही केली, असेही डॉ.साठय़े यांनी सांगितले.

दोन दिवस पावसाचे
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात ढगाळ वातावरण असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत आज बुधवारी पावसाचा हलका शिडकावा झाला. कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता असून पुढील दोन दिवस मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.

प्रभादेवी, वरळी,
दक्षिण मुंबई, कांजुरमार्ग, पवई, ठाणे, डोंबिवली आणि नवी मुंबईत पावसाचा हलका शिडकावाही झाला.