सरकारी यंत्रणांचा वापर केला असता तर अनेक नेते ‘बाहेर’ राहिले नसते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. मात्र आम्हाला सरकारी यंत्रणांचा वापर करायचा नव्हता. जर सरकारी एजन्सीचा वापर केला असता तर अनेक पक्षांचे नेते ‘बाहेर’ राहिले नसते, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी, भाजपने दिलेली आश्वासने, राममंदिर, शिवसेना-भाजप युती, मनसेची भूमिका अशा वेगवेगळ्या मुद्दय़ांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. भाजपचे दबावतंत्र सुरू असल्याच्या चर्चेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही सरकारी एजन्सीचा वापर केला असता तर अनेक पक्षांचे नेते बाहेर राहिले नसते. मात्र आम्हाला सरकारी यंत्रणांचा वापर करायचा नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

राममंदिर आस्थेचा विषय

भाजपच्या संकल्पपत्रात राममंदिराचे आश्वासन दिले आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, राममंदिर हा आस्थेचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयात राममंदिराच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बालाकोटवर हिंदुस्थानी हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचा पुरावा मागणाऱयांना भाजपने कधीही देशद्रोही म्हटले नाही. मात्र सैन्याने दिलेल्या माहितीवर आतापर्यंत कोणीही अविश्वास दाखवलेला नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शरद पवारांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यात जातीभेदाचे विष पसरवत असल्याचा आरोप करून मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शरद पवार चालवत आहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी मारला. राष्ट्रवादी काँग्रेसने कशी वागणूक दिली हे धनगर समाजानेही पाहिले याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

राज ठाकरेंवर टीका

या वेळी त्यांनी राज ठाकरे व मनसेवर जोरदार टीका केली. राज ठाकरे हे वाट चुकलेले नेते असून ते आता पूर्णपणे वैफल्यग्रस्त झाले आहेत. मनसे आता ‘उनसे’ झाली आहे. उनसे म्हणजे ‘उमेदवार नसलेली सेना’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली.

विकासाच्या मुद्दय़ावर एकमत

शिवसेना-भाजप युतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, शिवसेना-भाजपमध्ये अनेक कुरबुरी झाल्या. मात्र विकासाच्या मुद्दय़ावर दोन्ही पक्षांचे कायम एकमत आहे. आम्ही कधीच एकमेकांपासून दूर गेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जीएसटीमुळे भ्रष्टाचार बंद

जीएसटीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, जीएसटीमुळे भ्रष्टाचार बंद झाला आणि सरकारी तिजोरीत पैसा आला. हा पैसा सर्वसामान्य माणूस, शेतकरी यांच्यापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून पोहोचणार आहे. भाजपच्या घोषणांबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच बोलले नव्हते. कोणताही व्हिडीओ किंवा भाजपचे संकल्पपत्र काढून बघा, असे आव्हानही त्यांनी दिले. भाजपने दिलेल्या 540 आश्वासनांपैकी 520 आश्वासने पूर्ण झाली आहेत तर वीस आश्वासने पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.