सीएनजी बसची तपासणी शनिवार-रविवार रात्री होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

दिंडोशी येथे 15 दिवसांपूर्वी ‘बेस्ट’च्या सीएनजी बसला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी नियमित तपासणीबरोबरच शनिवार-रविवार रात्री सीएनजी गाडय़ांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुदैवाने या आगीत मोठी दुर्घटना टळली असली तरी संपूर्ण बस जळाल्याने 25 लाखांचे नुकसान झाले आहे.

दिंडोशी येथील दुर्घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. 3 मार्च रोजी घडलेल्या या घटनेत बस क्रमांक 646 ने गोरेगाव स्थानक पूर्व येथून नागरी निवारा परिषद येथे जाताना अचानक पेट घेतला होता. या बसमधील 3 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रसंगावधान बेस्ट चालकाने व वाहकाने दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या बस गाडीच्या चालकाला उतरताना डाव्या पायाला दुखापत झाली होती. या बसमध्ये जास्त प्रवासी असते तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र बस जळाल्याने बेस्टचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात बेस्टच्या सीएनजी बसची तपासणी शनिवार व रविवारी रात्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रेशर गेजचा स्फोट होऊन लागली आग
या घटनेच्या चौकशीत चालक किंवा वाहकाची कोणतीही चूक नसल्याचे प्रशासनाने बेस्ट समितीला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. ही बस आगारातून बाहेर काढताना बसच्या टाकीत पूर्ण गॅस होता. कोणतीही गळती होत नव्हती. ही बस नियमित तपासण्यात आली होती व बसमध्ये कोणतीही तक्रार नव्हती असे आढळून आले होते. असे असतानाही बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने ‘सीएनजी’ बसला ‘प्रेशर गेज’चा स्फोट होऊन आग लागल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशा घटना टाळण्यासाठी यापुढे सर्व 1885 ‘सीएनजी’ बसेसचे ‘प्रेशर गेज’ बदलण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.