मुंबईची तब्येत बिघडली, आठवडय़ात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण दुप्पट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात आला असला तरी आठवडाभरात पावसाळी आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मागील आठवडाभरात डेंग्यूचे 51, मलेरिया 118 तर गॅस्ट्रो 83 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी घर परिसर स्वच्छ ठेवून काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत या वर्षी पावसाळी आजारांमुळे ऑगस्टपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लेप्टो-मलेरियामुळे प्रत्येकी 1 आणि डेंग्यू-स्वाइन फ्लूमुळे प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्टमधील  पावसाळी आजारांच्या स्थितीने पालिकेचे टेन्शन वाढले होते. मात्र ऑगस्टअखेरीस पुन्हा रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने दिलासा मिळाला होता. मात्र सप्टेंबरमध्ये पावसाळी आजारांनी पुन्हा डोके वर काढल्याने पालिकेचे टेन्शन पुन्हा वाढले आहे. पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाइड, कॉलरा, जाँडीस असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.  पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरकडे जा!

n स्वाइन फ्लू आजारात ताप, कफ, घशात इन्फेक्शन, शरीर जखडणे, डोकेदुखी, अतिसार, उलटी अशी लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास वाढणारा प्रसार रोखण्यासाठी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

n शिवाय शिंकताना, खोकताना नाकावर रुमाल पकडावा, वेळोवेळी हात साबण पाण्याने स्वच्छ धुवावेत, डोळे-कान-तोंडाला वारंवार स्पर्श करू नये, गर्दी टाळावी, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पावसाळी आजारांसाठी पालिकेने दीड हजार बेड तैनात ठेवले आहेत. शिवाय घरोघरी तपासणी आणि औषध-गोळ्यांचे वाटपही करण्यात येत आहे.

 

सप्टेंबरमधील रुग्ण संख्या

मलेरिया          207

स्वाईन फ्लू       6

डेंग्यू              80

लेप्टो             18

गॅस्ट्रो             121

कावीळ           14

चिकनगुनिया     2