कोरोना नरमला! मुंबईत बेड 23 हजार, रुग्ण 1500

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना आता चांगलाच  नरमला असून एकूण 23 हजार बेड उपलब्ध असताना केवळ 1500 बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये कार्यान्वित असलेल्या पाच जम्बो कोविड सेंटरमधील 6 हजार बेडवर केवळ 300 रुग्ण उपचार घेत आहेत. शिवाय सद्यस्थितीत 2823 सक्रिय रुग्ण असून 1524 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. ही आकडेवारी मुंबईसाठी दिलासादायक आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर दोन लाटांमध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत एकूण 7 लाख 59 हजार 593 बाधित रुग्ण आढळले. यामध्ये 16 हजार 292 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, मात्र तब्बल 7 लाख 37 हजार 930 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. फेब्रुवारीच्या मध्यावर आलेली कोरोनाची दुसरी लाटही आता नियंत्रणात आल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्क्यांवर पोहोचला असून रुग्णवाढीचा कालावधी 0.03 टक्क्यांवर खाली आला आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही प्रत्येक दिवशी कमी होत असल्याची सकारात्मक स्थिती मुंबईसाठी निर्माण झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

जम्बो कोविड सेंटरमध्ये 6 हजार बेड; 300 रुग्ण

कोविड सेंटरमधील रुग्ण

एनएससीआय, वरळी – 15

नेस्को गोरेगाव – 13

मुलुंड जम्बो सेंटर – 19

बीकेसी जम्बो सेंटर – 6

भायखळा आरएसी – 20

सेव्हन हिल्स अंधेरी – 100

मुंबईची सद्यस्थिती

एकूण सक्रिय रुग्ण – 2823

लक्षणे असलेले रुग्ण – 1041

लक्षणे नसलेले रुण – 1524

अत्यवस्थ रुग्ण – 258

रुग्ण दुपटीचा कालावधी – 2010 दिवस