
मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोनाचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी पालिकेने ‘अखेरचा घाव’ घालण्यासाठी प्रभावी मोहीम हाती घेतली असून आज 2 नोव्हेंबरपासून पालिका क्षेत्रात तब्बल 244 ठिकाणी मोफत ‘कोरोना चाचणी’ आणि वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये आधीपासून उपलब्ध असणार्या 54 खासगी कोरोना चाचणी सेंटरमुळे चाचण्यांच्या एकूण सेंटरची संख्या 300 हून जास्त होणार आहे.
मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असून रुग्ण बरे होण्याचा दर 88 टक्क्यांवर गेला असून रुग्णवाढीचा सरासरी दरही 0.42 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी पालिकेने आता आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली आणखी प्रभावी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये चाचण्यांची संख्या वाढवून प्रभावी उपाययोजना केल्या जाणार आहेत. मुंबईत याआधी पालिकेच्या माध्यमातून सुमारे 100 कोरोना चाचणी केंद्रांवर आणि 54 खासगी केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात होती. आता सुमारे 150 चाचणी-तपासणी केंद्रे वाढवल्याने प्रत्येक विभागात 10 ते 12 केंद्र उपलब्ध होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. दरम्यान, पालिकेच्या चाचणी केंद्रावर मोफत चाचणी-वैद्यकीय तपासणी होणार असून पालिका क्षेत्रातील 54 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येही या आधीपासूनच चाचणी सुविधा सशुल्क स्वरूपात उपलब्ध आहे. यासाठी सुधारित शासकीय दरांनुसार घरी येऊन वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुपये 1800/-, तर प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करवून घेण्यासाठी रुपये 1400/- एवढे शुल्क आकारले जाईल.
येथे संपर्क करा, तपासणी-चाचणी करून घ्या!
कोविडची लक्षणे असल्यास आपल्या घराजवळील ठिकाणांची माहिती विभागीय हेल्पलाईनद्वारे आणि ‘1916′ या दूरध्वनी क्रमांकाद्वारेही मिळू शकणार आहे. याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे http://stopcoronavirus.mcgm.gov.in या स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेल्या समर्पित संकेतस्थळावरदेखील ही माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी मुंबईकरांनी कोणतीही लक्षणे, शंका असल्यास वरील सुविधांवर संपर्क करून तपासणी-चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे.
‘वॉक इन’ पद्धतीने सुविधा
तपासणी-चाचणीची सुविधा दररोज सकाळी 10 ते 12 या कालावधीदरम्यान सदर 244 ठिकाणी थेट म्हणजेच ‘वॉक इन’ पद्धतीने उपलब्ध असणार आहे. यापैकी काही ठिकाणी आरटीपीसीआर पद्धतीची चाचणी तर काही ठिकाणी अँटिजन प्रकारची कोरोना चाचणी होणार आहे. या नव्या चाचणी केंद्रांमुळे पालिकेची 244, खासगी 54 आणि राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मिळून 300 पेक्षा जास्त चाचणी केंद्रे पालिका क्षेत्रात उपलब्ध होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
http://stopcoronavirus.mcgm.gov.in




























































