मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 372 दिवसांवर, दिवसभरात 578 कोरोना रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत आज दिवसभरात 578 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 493 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 372 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 76 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 70 हजार 628 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 372 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजार 355 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 23 लाख 2 हजार 900 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 90 हजार 914 वर पोहोचली आहे.

राज्यात दिवसभरात 2,124 जण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर

कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश येत असून राज्यात आज दिवसभरात 2 हजार 124 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.29 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 314 कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना पार्श्वभूमीवर राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 66 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.57 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 25 लाख 2 हजार 554 चाचण्या झाल्या असून 19 लाख 19 हजार 550 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 4 लाख 57 हजार 385 जण होम क्वारंटाइन असून 3 हजार 323 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.