
राज्यात पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा जाणवू लागला असून रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना पुढे येण्याचे आवाहन मुंबई उपनगर श्री सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात जास्तीत जास्त गणेशभक्तांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन समन्वय समितीचे सचिव विनोद घोसाळकर यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे, तशी माहितीदेखील राज्य सरकारतर्फे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठय़ा प्रमाणात रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई उपनगर श्री सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने दिला आहे. राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी मुंबई व उपनगरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्वरित एकत्रित येऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत आणि अधिकाअधिक रक्तसाठा करण्याचा खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन मुंबई उपनगर श्री सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने केले आहे. ज्यास मुंबई उपनगरातील अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे.
”रक्तदान शिबीर आयोजित करताना कोरोनाविरोधात महाराष्ट्र आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेल्या सर्व अटी व नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे.” – विनोद घोसाळकर, सचिव, मुंबई उपनगर श्री सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती


























































