
मुंबई उपनगरीय लोकलमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना तसेच लोकलमधून पडून संपलेल्या 2020मध्ये एकूण तिन्ही मार्ग मिळून एकूण 1116 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 878 जण जखमी झाले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत आकडेवारी 2664 जणांचा मृत्यू आणि 3158 जण जखमी अशी होती. यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवेश नसल्याने अपघातांमध्ये सुमारे 60 टक्के घट झाली असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून उघडकीस आली आहे.
मुंबई उपनगरीय लोकलमधून दररोज 75 ते 80 लाख लोक प्रवास करीत असतात. त्यामुळे दररोज सरासरी दहा प्रवाशांचा मृत्यू होत असे. आता ही आकडेवारी सुदैवाने कमी कमी होत आली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलीस यांच्याकडे जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये लोकल अपघातात किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जखमी झाले याची आकडेवारी मागितली होती. लोहमार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संपलेल्या 2020 या वर्षांत मुंबई उपनगरी मार्गावर लोकलमधून पडून किंवा रूळ ओलांडताना 1116 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात 983 पुरुष व 133 महिलांचा समावेश आहे.
कोणत्या वर्षी किती मृत्यू आणि किती जखमी
साल मृत्यू जखमी
- 2015 3304 3349
- 2016 3202 3363
- 2017 3014 3345
- 2018 2981 3349
- 2019 2664 3158
- 2020 1116 878
































































