
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. अधिवेशनाच्या कालावधीबाबतचा निर्णय या महिन्याच्या अखेरीस होणाऱया कामकाज समितीच्या बैठकीत घेण्यात येईल.
7 डिसेंबरपासून अधिवेशन घेता येईल का आणि किती दिवस घ्यायचे याबाबतही या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱया सुविधांचाही आढावा घेण्यात आला. विधिमंडळ सदस्यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेणे योग्य होणार नाही अशा सूचना यावेळी केल्या.




























































