आता आवाजाने होणार कोरोना चाचणी; आदित्य ठाकरे यांनी केले ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यात आता कोरोना चाचणीसाठी आवाजाचा वापर (व्हाईस सॅम्पल)चा वापर केला जाणार आहे. मुंबईतील एक हजार रुग्णांवर हा प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग केला जाणार आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली. यामुळे कोरोनाचे लवकर निदान होऊन त्यावर अधिक जलद गतीने मात करणे शक्य होणार आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार विविध तंत्रज्ञानावर आधारीत उपक्रम राबवत आहेत. त्यात आता आर्टिफिशल इंटेलिजेंस बेस्ड तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याची माहिती देताना सांगितले, ‘मुंबई महानगरपालिका आवाजाच्या साहाय्याने कोरोनाचे निदान करण्याचा एक प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोग आम्ही लवकरच हाती घेणार आहोत. या नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच कोरोनासाठी केली जाणारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीही सुरू राहणार आहे. कोरोनाचे निदान कमीत कमी वेळेत व्हावे, यासाठी जगभरात तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी त्याचा मोठय़ा प्रमाणात फायदाही होत आहे. कोरोनामुळे तंत्रज्ञानाकडे पाहाण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे. तंत्रज्ञानामुळे आरोग्य यंत्रणेला अधिक बळकटी देण्याचे जगभर होत आहे, ’असे ते ट्विटमध्ये म्हणाले.