
पटकथा लेखकाचे क्रेडिट कार्ड चोरून त्याच्या बँक खात्यावर डल्ला मारणाऱ्या दोघींना चारकोप पोलिसांनी अटक केली. श्वेता झा आणि आरोही कारंडे अशी त्या दोघींची नावे असून त्या सध्या पोलीस कोठडीत आहेत.
तक्रारदार हे पटकथा लेखक असून ते चारकोप परिसरात राहतात. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात श्वेता आणि आरोही या तक्रारदारांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी त्या पुन्हा तक्रारदारांना भेटण्यासाठी चारकोप येथे आल्या. तक्रारदारांना बोलण्यात गुंतवून त्या दोघींनी तक्रारदाराच्या पाकिटातील क्रेडिट कार्ड आणि मोबाईलमधील सीमकार्ड चोरले होते.
याप्रकरणी तक्रारदाराने चारकोप पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवून श्वेता आणि आरोहीला अटक केली. या गुन्ह्यात आणखी एकजण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


























































