सायबर गुन्हेगारांकडून एनी डेस्क, बनावट लिंकचा सापळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगल सर्चचा होणारा सर्रास वापर सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर पडला आहे. अज्ञात इसमाने एनी डेस्क ऍप डाऊनलोड करण्यास किवा एखादी लिंक पाठवून माहिती भरण्यास सांगितल्यास सावधान…! आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर भामटय़ांकडून लावण्यात येणारा हा सापळा आहे. दररोज अनेकजण या सापळय़ात अडकून आपले लाखो रुपये गमावत आहेत.

कोणतीही माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्चचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. हीच बाब हेरत सायबर गुन्हेगार गुगलवरच बोगस वेबसाईट अपलोड करत आहेत. नकळत त्या साईटवर जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱयांना सायबर गुन्हेगार आपले लक्ष्य बनवत आहेत. एखाद्या कंपनीची किंवा आवश्यक बाबीसाठी माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना हे आरोपी संपर्क साधतात. आपण संबंधित कंपनी आणि कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून समोरच्या व्यक्तीला वेगवेगळी विलोभणे दाखवतात. मग शिताफीने लिंक पाठवून एनी डेक्स ऍप डाऊनलोड करण्यास सांगतात. येथेच सापळय़ात अडकवले जाते. त्या एनी डेस्क ऍपच्या माध्यमातून भामटे नागरिकांची इत्यंभूत माहिती मिळवितात. त्यानंतर चलाखीने सायबर गुन्हेगार नागरिकांच्या बँक खात्यातील पैसे वळते करून घेत असल्याचे गुन्हे मोठय़ा प्रमाणात घडू लागले आहेत. सध्या एनी डेक्स ऍपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर म्हणजे सुशिक्षित व चांगल्या पदावर कार्यरत असलेले नागरिकच सायबर गुन्हेगारांच्या सापळय़ात सहज अडकत आहेत.

लिंकवर क्लिक करू नका!

आपण एखाद्या कंपनी किंवा एजन्सीचा शोध असताना अचानक अज्ञात व्यक्तीचा कॉल आला आणि तो संबंधित ठिकाणाहून बोलतोय असे सांगू लागला की सावध व्हा. ती व्यक्ती बोलण्यात गुंतवून एखादी लिंक पाठवून त्यावर माहिती भरण्यास सांगेल, मात्र अशा लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.