सनबन कार्यक्रमामध्ये चोऱ्या करणारा अटकेत 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सनबन अरेना फीट कार्यक्रमात तरुणाचे मोबाईल लांबवणाऱ्याला बीकेसी पोलिसांनी अटक केली. मोहसीन खान असे त्याचे नाव असून त्याच्याकडून दोन आयपह्न हस्तगत केले आहेत. त्याच्या अटकेने 10 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सनबन अरेना फीट या कार्यक्रमात मोठय़ा संख्येने तरुण हजेरी लावतात. खासकरून डी.जे. स्नेकच्या गाण्यावर ठेका धरण्यासाठी राज्यातून तरुण मंडळी येत असतात. सनबन कार्यक्रमासाठी सोशल मीडियावर जाहिरातदेखील करण्यात आली होती. शनिवारी बीकेसीच्या फटाका मैदानात सनबन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सायंकाळी चारनंतर सुरुवात झाली. रात्री साडेदहापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता.

कार्यक्रम सुरू झाल्यावर एक तरुणाला त्याचा मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने बीकेसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आयपह्न चोरीप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. परिमंडळ 8 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक विश्राम अभ्यंकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजेश गवळी आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांना मोहसीनची माहिती मिळाली. त्याला वांद्रे परिसरातून ताब्यात घेतले. मोहसीनकडून दोन महागडे आयपह्न जप्त केले आहेत. तो भिवंडीचा रहिवासी असून चोऱ्या करण्यासाठी तो मुंबईत आला होता. मोबाईलचोरीच्या आतापर्यंत 14 तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. मोहसीनच्या अटकेने 10 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. खानला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा अन्य कोणी साथीदार आहे का याचा तपास बीकेसी पोलीस करत आहेत.